‘बीबीसी न्यूज’कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मुसलमानांवरून द्वेषपूर्ण मालिका

  • ब्रिटनचे खासदार लॉर्ड रामी रेंजर यांची ‘बीबीसी न्यूज’वर कठोर टीका !

  • ‘बीबीसी न्यूच’चे वार्तांकन पक्षपातपूर्ण !

डावीकडून लॉर्ड रामी रेंजर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – ब्रिटनचे खासदार लॉर्ड रामी रेंजर यांनी गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीवरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बनवलेल्या मालिकेवरून ‘बीबीसी न्यूज’ या वृत्तवाहिनीवर कठोर टीका केली आहे. खासदार रामी यांनी ट्वीट करून म्हटले आहे, ‘बीबीसी न्यूज’ने भारताच्या कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि लोकशाहीपद्धतीने निवडून आलेले भारताचे पंतप्रधान, तसेच भारतीय पोलीस, न्यायपालिका यांची अपकीर्ती केली आहे. आम्ही या दंगलीत लोकांना ठार करणार्‍यांची निंदा करतो; मात्र तुम्ही पक्षपातपणे केलेल्या वार्तांकनाचीही निंदा करतो.’

‘बीबीसी न्यूज’ने ‘इंडिया : द मोदी क्वेश्‍चन’ या शीर्षकाच्या अंतर्गत दोन भागांची मालिका बनवली आहे. यात पंतप्रधान मोदी आणि भारतातील मुसलमान यांच्यातील तणावाविषयी भाष्य करण्यात आले आहे. तसेच गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीतील पंतप्रधान मोदी यांची कथित भूमिका आणि दंगलीत ठार झालेल्या शेकडो लोकांवरून आरोप केले आहेत. तसेच मोदी सरकार यांची देशातील मुसलमानांच्या लोकसंख्येविषयीची भूमिका, कथित वादग्रस्त धोरणे, काश्मीरला असलेला विशेषाधिकार काढणे आणि नागरिकता कायदा यांवरून प्रश्‍न उपस्थित करण्यात आले आहेत. देशातील मुसलमानांवर हिंदूंकडून आक्रमणे होत आहेत, असेही यात म्हटले आहे. भारतीय लोकांवरही टीका करण्यात आली आहे.

सामाजिक माध्यांतून ‘बीबीसी न्यूज’वर टीका

‘बीबीसी न्यूज’ने वर्ष १९४३ च्या बंगालमधील दुष्काळावर मालिका बनवावी !

पंतप्रधान मोदी यांच्याविषयीच्या मालिकेवरून सामाजिक माध्यमांतून ‘बीबीसी न्यूज’वर टीका होत आहेत. काही जणांनी म्हटले आहे, ‘वर्ष १९४३ मध्ये बंगालमध्ये आलेल्या दुष्काळामुळे ३० लाख लोकांचा भूकेमुळे मृत्यू झाला. बीबीसीने त्याविषयी मालिका बनवली पाहिजे.’ ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी दुसर्‍या महायुद्धातील सैनिकांसाठी भारतातून अन्नधान्य नेल्यामुळे बंगालमध्ये लोकांचा भूकबळी गेला होता.

संपादकीय भूमिका

बीबीसी म्हणजे हिंदुद्वेषी, भारतद्वेषी वृत्तवाहिनी, असेच समीकरण आहे. त्यामुळे तिच्याकडून याहून वेगळे काही होणे शक्य नाही ! अशा वृत्तवाहिनीवर भारतात बंदी घालणेच योग्य !