भावपूर्ण व्‍हायोलिन वादनातून श्रोत्‍यांना आनंद देणारे मुंबईतील प्रसिद्ध व्‍हायोलिन वादक पं. मिलिंद रायकर (वय ५८ वर्षे) !

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग्य वादनसाधना

क्षणचित्रे

१. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संशोधन पाहून ‘मलाही संगीतातील नवीन प्रयोग करण्‍याविषयी सूत्रे सुचत आहेत’, असे पं. रायकर म्‍हणाले. ‘संगीत संशोधन आवडल्‍याने अशा प्रकारचे संशोधन वाढावे’, यासाठी त्‍यांनी त्‍यांच्‍याशी परिचित कलाकारांना संपर्क करून त्‍यांना या संशोधनात सहभागी करण्‍याचा प्रयत्न केला.

२. पं. रायकर यांनी त्‍यांच्‍या व्‍हायोलिन ठेवण्‍याच्‍या पेटीच्‍या आतल्‍या बाजूला त्‍यांच्‍या गुरूंचे छायाचित्र आणि त्‍यांच्‍या इष्‍ट देवतेचे चित्र लावले आहे. यातून त्‍यांची गुरूंविषयीची श्रद्धा दिसून आली.

३. आश्रम पहात असतांना पं. रायकर यांनी प्रत्‍येक गोष्‍ट जिज्ञासेने पाहिली.’

– सौ. अनघा जोशी, बी.ए. (संगीत), (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के), महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालय, गोवा. (४.१.२०२३)

पं. मिलिंद रायकर यांचा परिचय

पं. मिलिंद रायकर

पं. मिलिंद रायकर मुंबई, महाराष्‍ट्र येथील असून ग्‍वाल्‍हेर घराण्‍याचे पंडित डी.के. दातार, तसेच गानसरस्‍वती स्‍व. किशोरी आमोणकर यांचे शिष्‍य आहेत. त्‍यांनी व्‍हायोलिनचे प्रारंभिक शिक्षण त्‍यांचे वडील श्री. अच्‍युत रायकर यांच्‍याकडे घेतले, तर पुढील शिक्षण प्रसिद्ध व्‍हायोलिनवादक पं. बी.एस्. मठ यांच्‍याकडून घेतले आहे. त्‍यांचे व्‍हायोलिनचे अनेक कार्यक्रम देश-विदेशांत होतात. वर्ष २००६ मध्‍ये त्‍यांनी ‘रायकर अ‍ॅकॅडमी ऑफ व्‍हायोलिन पं. डी.के. दातार परंपरा’ या संस्‍थेची स्‍थापना केली. या माध्‍यमातून ते विविध वयोगटांतील विद्यार्थ्‍यांना व्‍हायोलिनचे शिक्षण देत आहेत.

३०.१२.२०२२ या दिवशी पं. मिलिंद रायकर यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला भेट दिली. त्‍यांच्‍या संशोधनपर व्‍हायोलिन वादनाचा प्रयोग महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने करण्‍यात आला. त्‍या वेळी संत अन् साधक यांना आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

१. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संगीत संशोधन पाहून प्रभावित होऊन जिज्ञासेने प्रश्‍न विचारणारे पं. मिलिंद रायकर !

पं. रायकर यांनी संशोधन केंद्राला भेट दिल्‍यावर त्‍यांना महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या वतीने आतापर्यंत करण्‍यात आलेल्‍या गायन, वादन आणि नृत्‍य यांच्‍या ७०० हून अधिक प्रयोगांची माहिती देण्‍यात आली. महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संगीत समन्‍वयक कु. तेजल पात्रीकर यांनी त्‍यांना संगीत संशोधन दाखवले. संशोधन पाहून ते प्रभावित झाले आणि त्‍यांनी जिज्ञासेने प्रश्‍नही विचारले. हे संशोधन पाहून पं. रायकर यांनाही संगीतविषयक विविध प्रयोग सुचले. ते प्रयोग त्‍यांनी साधकांना करून पहाण्‍यास सांगितले.

२. उपस्‍थितांनी पं. रायकर यांच्‍या व्‍हायोलिनवरील भावपूर्ण सुरांचा आनंद अनुभवणे

व्‍हायोलिन हे वाद्य वाजवतांना पं. मिलिंद रायकर

नंतर पं. रायकर यांच्‍या व्‍हायोलिन वादनाचा प्रयोग घेण्‍यात आला. त्‍या वेळी त्‍यांनी व्‍हायोलिनवर राग ‘बागेश्री’ सादर केला. उपस्‍थित संत आणि साधक यांनी पं. रायकर यांच्‍या व्‍हायोलिनवरील भावपूर्ण सुरांचा आनंद अनुभवला.

३. व्‍हायोलिन वादनाच्‍या वेळी उपस्‍थित असलेले महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे संत अन् साधक यांना आलेल्‍या अनुभूती

३ अ. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. ‘व्‍हायोलिन वादनाला प्रारंभ झाल्‍यावर ‘माझी सुषुम्‍नानाडी कार्यरत झाली आहे’, असे मला जाणवले.

२. वादनाच्‍या प्रारंभी ‘वातावरणात शक्‍ती आणि चैतन्‍य यांची स्‍पंदने अधिक प्रमाणात आहेत’, असे जाणवून मूलाधार चक्रावर मला स्‍पंदने जाणवू लागली. त्‍यानंतर शक्‍तीची स्‍पंदने वाढत गेली. नंतर विशुद्धचक्र अन् सर्वांत शेवटी माझ्‍या सहस्रारावर संवेदना जाणवली.

३. या रागात भाव, चैतन्‍य आणि शांती यांची स्‍पंदने अधिक प्रमाणात होती. यात देवी, दत्त, हनुमान आणि शिव अशा चारही देवतांची तत्त्वे मला जाणवली.’

३ आ. श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के) सूक्ष्म ज्ञानप्राप्‍तकर्ते साधक

१. व्‍हायोलिनवादन चालू झाल्‍यावर वातावरणातील दाब न्‍यून होऊन नंतर शक्‍तीची स्‍पंदने अधिक प्रमाणात जाणवू लागली.

२. मला ‘श्री दुर्गादेवी’ आणि ‘हनुमान’ यांचे दर्शन झाले अन् कार्यक्रमस्‍थळी ‘गंधर्व आणि स्‍वर्ग या लोकांतील संमिश्र वातावरण निर्माण झाले आहे’, असे जाणवले.

३. द्रुत (जलद) गतीमध्‍ये आनंदाचे प्रमाण अधिक होते. या वेळी मला दैवी सुगंध आला.’

३ इ. आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के)

१. ‘पं. रायकर यांचे वादन भावपूर्ण होतेे. वादन संपेपर्यंत माझा भाव टिकून राहिला.

२. पं. रायकर यांच्‍या वादनाने माझ्‍या आनंदाचे प्रमाण वाढले. मला माझ्‍या अनाहत चक्रावर संवेदना जाणवल्‍या.

३. वादनाच्‍या वेळी माझे ध्‍यान लागले. ते वाजवत असलेल्‍या रागात मला शिवतत्त्व आणि देवीतत्त्व जाणवले.’

३ ई. होमिओपॅथी वैद्या (सुश्री (कु.)) आरती तिवारी

१. ‘व्‍हायोलिन’ हे पाश्‍चिमात्‍य वाद्य असूनही ते ऐकतांना ‘भारतीय वाद्यच ऐकत आहोत’, असे मला जाणवत होते.

२. वादनातून प्रक्षेपित होणारी स्‍पंदने सात्त्विक होती.

३. वादनाच्‍या शेवटी आनंदात पुष्‍कळ वाढ झाल्‍याने मला भगवान श्रीकृष्‍णाचे स्‍मरण झाले.

४. ‘मी सूक्ष्मातून निसर्गरम्‍य वातावरणात आहे’, असे मला जाणवत होते. मला माझ्‍या डोळ्‍यांसमोर मोर दिसले.’

३ उ. श्री. अमित डगवार

‘व्‍हायोलिन वादनाचा प्रयोग आहे’, हे कळल्‍यावर ‘ते विदेशी वाद्य आहे. त्‍यामुळे आध्‍यात्मिक त्रास होऊ शकेल’, असे मला प्रारंभी वाटले. पं. मिलिंद रायकर यांनी व्‍हायोलिन एवढे भावपूर्ण रितीने वाजवले की, ‘माझे ध्‍यान लागून मला चैतन्‍य मिळाले’, असे मला जाणवले.’

३ ऊ. सौ. नेहा प्रभू

‘वादन ऐकतांना मला हलकेपणा जाणवला आणि माझे मन स्‍थिर झाले.’

३ ए. सौ. अनघा जोशी, बी.ए. (संगीत) (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के)

‘पं. रायकर पूर्णवेळ डोळे मिटून व्‍हायोलिन वादन करत होते. तेव्‍हा ‘ते वादनाशी पूर्णपणे एकरूप झाले आहेत’, असे मला जाणवलेे. द्रुत (जलद) गतीतील बंदिशीच्‍या वेळी आनंदाचे प्रमाण वाढत गेले.’

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या आणि सद् गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.