श्रीरामपूर (जिल्हा नगर) येथील आयुर्वेदतज्ञ वैद्य मकवाना यांना ‘आयुर्वेदरत्न २०२३’ पुरस्कार !

पुरस्कार स्वीकारतांना मध्यभागी डॉ. अमित मकवाना आणि समवेत पत्नी डॉ. नेहा

जालना – येथे ७ आणि ८ जानेवारी या दिवशी धुळ्यातील आयुर्वेद क्षेत्रातील ज्येष्ठ आणि ऋषितुल्य वैद्य कै. प्र.ता. जोशी (नाना) यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवाद गुरुस्मरण २३’चे आयोजन केले होते. यात भारतभरातील १ सहस्र २०० वैद्य सहभागी झाले. विविध आयुर्वेदतज्ञांनी मार्गदर्शन केले. आयुर्वेद क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या आणि उत्तम कौशल्य असणार्‍या ५ ज्येष्ठ वैद्य अन् ७ युवा वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. श्रीरामपूर येथील आयुर्वेदतज्ञ वैद्य अमित मकवाना यांना ‘वैश्विक गुरुकुल परिवारा’च्या वतीने ‘कुशल आयुर्वेद संघटक’ म्हणून ‘आयुर्वेदरत्न २०२३’ हा पुरस्कार देण्यात आला. ‘आई-वडिलांचे आशीर्वाद आणि आयुर्वेद क्षेत्रातील गुरुजनांचे मार्गदर्शन यांमुळेच पुरस्कार मिळाला. ज्यांनी पंचकर्माचे मूलभूत प्रात्यक्षिक शिकवले, असे वैद्य सतिष भट्टड आणि वैद्य प्रविण जोशी यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे भाग्यच आहे. हा गुरुप्रसादच मिळाला’, असे मनोगत वैद्य मकवाना यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.