प्रजासत्ताक दिनापूर्वी देहलीत आतंकवादी आक्रमणाचा कट उघड : दोन संशयितांना शस्त्रांसह अटक !

देहली पोलिस घटनास्थळी

नवी देहली – प्रजासत्ताकदिनी देहलीत आतंकवादी आक्रमण घडवून आणण्याचा कट उघड झाला आहे. या कटातील दोन संशयितांना शस्त्रांसह नुकतीच अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ हातबाँबही जप्त करण्यात आले आहेत.

१. देहली पोलिसांनी संशयित आतंकवादी नौशाद आणि जग्गा यांना जहांगीरपुरी येथून ‘अवैध कारवाया प्रतिबंधक कायद्या’च्या अंतर्गत अटक केली. दोन्ही आरोपींना पटियाला हाऊस न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.

२. अन्वेषणाच्या वेळी आरोपींनी सांगितले की, त्यांनी देहलीच्या बाहेरील भालस्व डेअरीमध्ये हातबाँब लपवले होते. यानंतर देहली पोलिसांनी १३ जानेवारी २०२३ या दिवशी धाड टाकून स्फोटके जप्त केली. आरोपींच्या अटकेच्या वेळी त्यांच्याकडून ३ पिस्तुले आणि २२ काडतूसे जप्त करण्यात आली.

३. पोलिसांच्या अन्वेषणाच्या वेळी आरोपी जगजित उपाख्य जग्गा हा बंदी घातलेल्या खलिस्तानी गटांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे आरोपी नौशाद हा ‘हरकत-उल्-अन्सार’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित असून दुहेरी हत्याकांडात शिक्षा भोगून नुकताच कारागृहातून बाहेर आला होता.

संपादकीय भूमिका

जनतेला प्रत्येक वर्षी आतंकवादाच्या सावटाखाली देशाचा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन साजरा करावा लागणे, हे गेल्या ७५ वर्षांतील सर्व सरकारांना लज्जास्पद !