महाबळेश्वर येथे ९ सहस्रांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत हिंदु जनआक्रोश मोर्चा !

सातारा, १२ जानेवारी (वार्ता.) – महाबळेश्वर येथे सकल हिंदु समाजाच्या वतीने नुकताच ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्च्याला प्रारंभ झाला. मुख्य बाजारपेठेतून मोर्चा मारुति मंदिरमार्गे नगरपालिकेजवळच्या मोकळ्या जागेत पोचला. तिथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. या वेळी व्यासपिठावर हिंदु राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, कराड येथील प्रखर धर्माभिमानी मेघा कदम आदी उपस्थित होते. त्यांनी मोर्च्याला संबोधित केले. या वेळी एका शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात जाऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. महाबळेश्वर आणि पंचक्रोशीतील ९ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदू मोर्च्यात सहभागी झाले होते.

अखंड हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी हा मोर्चा ! – धनंजय देसाई

काही आतंकवादी संघटनांनी ‘गजवा-ए-हिंद’चा (इस्लामीस्तान) संकल्प केला आहे. हा धोका लक्षात घेऊन हिंदूंनी जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद विसरून हिंदू म्हणून एक झाले पाहिजे. कायदा करण्यासाठी नव्हे, तर अखंड हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी हा मोर्चा आहे. अखंड हिंदु राष्ट्र हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच !
‘अखंड हिंदु राष्ट्र’ हेच आता आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे.

‘लव्ह जिहाद’विरोध कायदा झाला पाहिजे ! – सौ. भक्ती डाफळे

या वेळी सौ. भक्ती डाफळे म्हणाल्या की, देशात हिंदु युवतींना फूस लावून, प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून लव्ह जिहाद केला जात आहे. वर्ष २०१६ मध्ये २८ सहस्र युवती हरवल्याची तक्रार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली हरवणे याचा अर्थ काय ? त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधी सक्षम कायदा तर झालाच पाहिजे, तसेच या कायद्यावर कडक कार्यवाहीही झालीच पाहिजे.

धर्मांतर रोखावे आणि गोवंशहत्या बंदी कायद्यावर कडक कार्यवाही व्हावी ! – मेघा कदम

देशात मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. हिंदु संघटित झाला नाही, तर हिंदूच भारतात अल्पसंख्यांक होता कि काय, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे धर्मांतर रोखणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी कायदा असूनही अनेक ठिकाणी गोमांसानी भरलेले ट्रक पकडण्यात येत आहेत. याचा अर्थ काय ? त्यामुळे गोवंश हत्याबंदी कायद्यावर कडक कार्यवाही व्हावी, अशी सरकारकडून हिंदूंची अपेक्षा आहे.