अमेरिकेत तांत्रिक कारणांमुळे विमानसेवा ठप्प

  • ४ सहस्र उड्डाणे  स्थागित

  • टप्‍प्‍याटप्‍प्‍याने विमानसेवा पुन्‍हा चालू !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेमध्ये ‘नोटिस टू एयर मिशन’ या संगणकीय प्रणालीत बिघाड झाल्यामुळे विमानसेवा ठप्प झाली. जवळपास ४ सहस्र विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. अमेरिकी वेळेनुसार पहाटे ५.३१ च्या सुमारास हा तांत्रिक बिघाड उघडकीस आला. अमेरिकेतील जवळपास ४०० विमानांची उड्डाणे उशिराने होत आहेत. यामध्ये देशांतर्गत आणि परदेशातील उड्डाणांचा समावेश आहे.

या संदर्भात ‘फेडरल एव्हिएशन एजन्सी’ने एक पत्रक जारी केले आहे. यात म्हटले आहे की, ‘नोटिस टू एअर मिशन’ यंत्रणेत बिघाड झाला आहे. यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही यंत्रणा केव्हा नीट होईल, हे सांगता येत नाही. यंत्रणा सुधारण्याचे काम चालू आहे.

‘नोटीस टू एअर मिशन’ म्हणजे काय ?

‘नोटीस टू एअर मिशन’ हा विमान उड्डाणातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. यातूनच विमानांना उड्डाण घेण्याची आणि धावपट्टीवर उतरण्याची माहिती मिळते. ‘रिअल नोटीस टू एअर मिशन’ वेळेच्या संदर्भातील सर्व माहिती विमानतळ यंत्रणा किंवा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एअर ट्रॅफिक कंट्रोलला) देते. यानंतर हा कक्ष ती माहिती वैमानिकांपर्यंत पोचवतो. या प्रणालीद्वारे नैसर्गिक आपत्ती आणि इतर समस्यांवरही लक्ष ठेवले जाते.

संपादकीय भूमिका

अमेरिकेसारख्‍या प्रगत देशात तांत्रिक अडचणींमुळे विमानसेवा ठप्‍प होणे, ही घटना विज्ञान-तंत्रज्ञानाच्‍या मर्यादा स्‍पष्‍ट करते !