ठाणे, ८ जानेवारी (वार्ता.) – छत्रपती शिवरायांना गुरुस्थानी मानून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी युद्धनीती आणि राजकीय मुत्सद्देगिरी अवलंबली होती. काही अपवाद वगळता भारतरत्नांची यादी पाहिली, तर सावरकरांना ‘भारतरत्न’ नकोच. राष्ट्र आणि हिंदू यांचा विचार करणारे सावरकर हे खरे विश्वरत्न आहेत, असे परखड मत अभिनेता श्री. शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. ‘हिंदूंनी एकत्र येऊन धर्मावरील आघात रोखण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. ज्यादिवशी आपण ४९ टक्के होऊ, त्या दिवशी भारतातील निधर्मीवाद संपेल’, असेही ते म्हणाले. ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे नुकतेच ‘जयोस्तुते’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वा. सावरकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. त्या वेळी श्री. पोंक्षे बोलत होते.
या वेळी शेकडो श्रोत्यांसमोर वर्ष १८८३ ते १९१० पर्यंतचे सावरकरांचे कार्य आणि त्यांचे विविध पैलू श्री. पोंक्षे यांनी उलगडले. दयेचा अर्ज आणि माफीनामा यांवरून होणार्या आरोपांची चिरफाड करून श्री. पोंक्षे यांनी त्यावेळची वस्तूस्थिती मांडली. सध्या चालू असलेल्या महापुरुषांच्या अवमानावरून उद्विग्न होत ‘आगामी काळात महापुरुषांविषयी अवाक्षरही काढता येऊ नये, अशी दहशत निर्माण व्हायला हवी’, असे स्फुलिंगही त्यांनी उपस्थितांमध्ये चेतवले. ‘हिंदुस्थानात रहायचे असेल, तर हिंदु राष्ट्राचे कायदे पाळावेच लागतील’, असेही ते म्हणाले.