जानेवारी २०२३ पासून वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर देवद आश्रमात सेवा करण्यासाठी गेल्या आहेत. त्या निमित्ताने त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. वैद्या (कु.) मोनिका कल्याणकर यांना पुढील सेवा शिकण्यासाठी आणि प्रगतीसाठी अंतःकरणपूर्वक शुभेच्छा !
१. जवळीक साधणे
‘मोनिकाने फार अल्प कालावधीत आश्रमातील सर्व साधकांशी जवळीक साधली. ती सर्वांशीच अतिशय प्रेमाने बोलते. तिच्यातील गुणांमुळेच ती सर्वांनाच हवीहवीशी वाटते.
२. रुग्णांप्रती संवेदनशीलता
तिला जेव्हा आपण एखाद्या त्रासाविषयी सांगतो, तेव्हा ती आपल्याला पूर्ण बरे वाटेपर्यंत काळजी घेते. मध्यंतरी मला एक जड वस्तू उचलल्याने चमक भरली होती. वैद्यांनी मला शेक देण्यास आणि विश्रांती घेण्यास सांगितले होते; परंतु माझे ते दुखणे इतके वाढले की, मला विश्रांतीही घेणे अवघड जात होते. तिला संपर्क केल्यावर तिने सातत्याने औषधे पालटून आणि विविध उपाय सांगून मला बरे वाटेपर्यंत माझी चौकशी करण्यासह काळजी घेतली. खरेतर रामनाथी आश्रमात इतके रुग्ण आहेत की, कुणाकडूनही अशी अपेक्षा करायला नको; परंतु तिचा हा गुण साधकांत अभावानेच आढळतो. तिच्याकडे पाहून ‘ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित असे घडत आहे’, असे वाटते.
३. गुणग्राहकता
तिच्यातील या गुणामुळे ती कुणीही साधक किंवा संत यांच्या समवेत रुग्णसेवेसाठी जाऊन आली की, त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांचे गुण तत्परतेने लिहून देते. या गुणामुळेच बहुदा तिच्या मनात कुणाविषयीही नकारात्मकता किंवा प्रतिक्रिया नसतात.
४. भाव
४ अ. व्यष्टी भाव
१. तिचे वागणे, बोलणे आणि कृती यांतून भाव जाणवतो. एकदा एक साधिका तिचे दायित्व असणार्या साधकाविषयी बोलत होती. तेव्हा देवाला नमस्कार करतो, तसा भावपूर्ण नमस्कार करून ती म्हणाली, ‘‘ते माझे उत्तरदायी साधक आहेत. मला त्यांच्याकडून पुष्कळ शिकायचे आहे.’’ उत्तरदायी साधकांप्रती असा भाव काही साधकांत आणि तोही अल्प प्रमाणात जाणवतो.
२. ती नवीन असतांना एकदा मी तिला सहज माझ्या एका त्रासाविषयी बोलले होते. तेव्हा तो त्रास कशामुळे होतो, हे तिने क्षणाचाही विलंब न करता सांगितले. त्यानंतर मी चिकित्सालयात गेल्यावर उपचार घेण्याच्या दृष्टीने वैद्यांशी बोलले. तेव्हा त्यांनी मला ४ – ५ प्रश्न विचारले आणि माझ्या त्रासामागील कारण सांगितले. तेव्हा ‘तिच्यातील भावामुळे देव तिला साधकांना (रुग्णांना) कुठला त्रास आहे, हे लगेच सुचवतो. तिला बुद्धीने किंवा तर्काने उत्तर शोधावे लागत नाही’, हे माझ्या लक्षात आले. यातून कुठल्याही सेवेत भावाचे महत्त्व अधोरेखित होते.
४ आ. समष्टी भाव : तिच्या मनात साधकांप्रती अपार प्रीती आहे. कुणालाही बरे नसेल, तर त्याला आराम वाटेल आणि त्याची नियमित दिनचर्या होईल, तोपर्यंत ती प्रसंगी स्वतःची धावपळ झाली, तरी प्रयत्नरत असते. ती बर्याच वेळा साधकांच्या समवेत रुग्णालयात जाते, तेव्हा तेथे काही अयोग्य दिसले, तर ती लगेच समष्टीला शिकण्यासाठी आणि योग्य उपाययोजना काढण्यासाठी त्याचे लिखाण करून देते.
५. स्वीकारण्याची वृत्ती
जेव्हा तिने मला ती देवदला जात असल्याचे सांगितले, तेव्हा ती तितकी आनंदी दिसली नाही; म्हणून मी तिला विचारले, ‘‘तुला वाईट वाटत आहे का ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘असे काही नाही. जे होते, ते भल्यासाठीच ना ! ईश्वरेच्छा !’’ तिच्या देवदला जाण्याने मला नक्की पोकळी जाणवेल; पण तिने स्वीकारले आहे, तर मलाही ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारायलाच हवे.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, काही काळ का होईना; पण आपण मला अशी गुणी मुलगी (साधिका) दिलीत, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– सौ. छाया विवेक नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१२.२०२२)