‘पर्पल फेस्ट’चे पणजी येथे उद्घाटन

पणजी, ६ जानेवारी (वार्ता.) – भारतातील विकलांग व्यक्तींना घेऊन साजरा केला जाणारा पहिलाच सर्वसमावेशक उत्सव ‘पर्पल फेस्ट’चा पणजी येथे दिमाखात प्रारंभ झाला. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय आणि शक्तीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आदींची उपस्थिती होती. विकलांग व्यक्तींचे सशक्तीकरण करून सर्वांचा समावेश असलेल्या विश्वाची निर्मिती करणे या मुख्य उद्देशाने ‘पर्पल फेस्ट’चे आयोजन करण्यात आले आहे. ८ जानेवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे.

डावीकडून समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, केंद्रीय सामाजिक न्याय आणि शक्तीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, राज्य विकलांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर अन् आमदार जीत आरोलकर

‘पर्पल फेस्ट’ महोत्सवात केंद्रीय मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी विकलांग व्यक्तींच्या सशक्तीकरण विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन केले. सरकारी, खासगी, उद्योग क्षेत्र आदींमध्ये सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी जागृती करून विकलांगांच्या सशक्तीकरणासाठी योग्य समन्वय साधण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले, ‘‘अशा महोत्सवाच्या आयोजनामुळे विकलांग  व्यक्तीमध्ये आत्मबळ वाढण्यास, तसेच समाजात विकलांगांच्या सशक्तीकरणाविषयी जागृती होण्यास साहाय्य होते.’’