उरुसाच्‍या पार्श्‍वभूमीवर लोहगड आणि घेरेवाडी परिसरात ५ ते ८ जानेवारीमध्‍ये जमावबंदी !

(उरुस – मुसलमान सत्‍पुरुषाच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त होणारा उत्‍सव)

लोहगड

लोणावळा (जिल्‍हा पुणे) – लोहगडावर हाजी हजरत उमरशावली बाबा दर्ग्‍याचा उरुस ६ आणि ७ जानेवारी या दिवशी होणार आहे. दर्गा आणि मजारी यांचा कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्‍याने न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले आहे. त्‍याप्रमाणे लोहगडावरील अनधिकृत बांधकाम काढावे, ही बांधकामे अधिकृत करण्‍यासाठी उरुसाचा वापर केला जात आहे. त्‍यामुळे हा उरुस होऊ नये, यासाठी बजरंग दल आणि इतर संघटना यांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. त्‍याला स्‍थानिक ग्रामपंचायतींनीही पाठिंबा दर्शवला आहे; मात्र या उरुसासाठी मुसलमान समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात लोहगडाच्‍या परिसरामध्‍ये येण्‍याची शक्‍यता असल्‍याने कायदा आणि सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी तात्‍काळ प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून ५ ते ८ जानेवारी या काळात लोहगड आणि घेरेवाडी या परिसरात कलम १४४ अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश मावळचे उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (मावळ-मुळशी) संदेश शिर्केेें यांनी लागू केला आहे. त्‍यामुळे या परिसरात ५ किंवा त्‍यापेक्षा अधिक नागरिकांना एकत्र जमता येणार नाही.

भारतीय पुरातत्‍व विभाग, पुणे यांनीही लोहगडावर दर्ग्‍याच्‍या उरुसाला अनुमती नाकारली असून त्‍या काळात पोलीस बंदोबस्‍ताची मागणी केली आहे.