जालना – येथील रेल्वेस्थानकाच्या समोर १०० फूट उंचीवर डौलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे राष्ट्रभक्त संतप्त झाले आहेत. १६ ऑगस्ट २०२२ या दिवशी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या ध्वजाचे अनावरण झाले होते. मागील वेळीही राष्ट्रध्वज फाटल्याने तो पालटण्यात आला होता. त्यामुळे अवघ्या साडेचार मासांत २ वेळेस हा राष्ट्रध्वज पालटावा लागला.
१. रेल्वेच्या व्यवस्थापकांनी मासाभरापूर्वी जालना रेल्वेस्थानकाची १५ मिनिटांत पहाणी आटोपली होती. स्थानिक अधिकार्यांनी त्यांची दिशाभूल करून त्यांना ती उरकती घ्यायला लावली होती. (या प्रकरणाची अधिक चौकशी व्हायला हवी ! – संपादक)
२. सद्य परिस्थितीत पांढराशुभ्र दिसणारा रंग धुळीने माखल्यामुळे काळाकुट्ट झाला आहे.
३. रेल्वे प्रशासनाच्या अभियांत्रिकी विभागाच्या वतीने या ध्वजाची खरेदी केली जाते आणि अनुमाने २६ सहस्र रुपये या राष्ट्रध्वजासाठी मोजले जातात. त्यामुळे हा व्यय कुणासाठी केला जातो ? आणि त्या बदल्यात किती गुणवत्ता मिळते ? हे पडताळण्याची आवश्यकता आहे. (सहस्रो रुपयांची खरेदी केलेला राष्ट्रध्वज फाटतो कसा ? त्यात इतकी निकृष्टता कशी ? – संपादक)
संपादकीय भूमिकातिसर्या वेळी लावण्यात येणार्या राष्ट्रध्वजाची गुणवत्ता संबंधितांनी पडताळून घ्यायला हवी ! |