मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाठपुरावा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबईत विश्व मराठी संमेलनाला प्रारंभ !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई – जी भाषा सर्वांना जोडते, सर्वांना सामावून घेते आणि जात, धर्म, पंथ पलीकडची माणुसकी शिकवते तीच खर्‍या अर्थाने विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर मिळावा, यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाला ४ जानेवारी या दिवशी वरळी येथील ‘नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया’ येथे प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, खासदार हेमंत पाटील यांसह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या संमेलनाला राज्यशासन पूर्ण पाठबळ देईल. प्रति २ वर्षांनी राज्यातील नव्या शहरांमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल. मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे. मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये. मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसांनाही मुंबईत परत कसे आणता येईल, यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे मातृभाषेत होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाहीत. मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षण राज्याच्या भाषेत सिद्ध करण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले आहे. महाराष्ट्राने त्यानुसार काम चालू केले असून त्यात आघाडी घेतली आहे. मराठीला ज्ञानभाषा करण्याचे काम राज्यशासन करत आहे. येत्या काळामध्ये मराठी माणूस उद्योग आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये अग्रेसर पहायला मिळेल. यासाठी एक अतिशय चांगली अर्थव्यवस्था राज्यात सिद्ध करत आहोत.

या संमेलनात परदेशातील ४९८ प्रतिनिधी सहभागी झाले होते. यामध्ये २ उद्योजकांचाही समावेश होता. जात्यावरील ओव्या, रांगोळीने सजलेले तुळशी वृंदावन, मराठी पारंपरिक लोकनृत्य आदी मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आले होते.