सांगली – आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळे यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद असून त्यांची पत्नी अद्याप पसार आहे. त्यांची संपत्ती, तसेच गेल्या १० वर्षांत केलेल्या कारभाराचे अन्वेषण करण्याची मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत केली आहे. गेळे यांच्या विरोधात हिंदु समाजाने आटपाडी येथे मोर्चा काढला होता. त्यामुळे हा प्रश्न न्यायप्रविष्ट असतांना सांगलीतील ख्रिस्ती संघटनांनी ७ जानेवारीला गेळेंच्या समर्थनार्थ मोर्चा काढणे म्हणजे पोलीस यंत्रणेवर दबाव आणण्याचे काम आहे. तरी आटपाडीतील ख्रिस्ती धर्मप्रचारक संजय गेळेंच्या समर्थनार्थ निघणार्या मोर्चास पोलिसांनी अनुमती देऊ नये आणि दिल्यास आम्हाला प्रतिमोर्चा काढण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी सकल हिंदु समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
गावभागातील केशवनाथ मंदिर येथे पार पडलेल्या या बैठकीत माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे पृथ्वीराज पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन देशमाने, मकरंद देशपांडे, श्रीराम कुलकर्णी, अधिवक्ता बाळासाहेब देशपांडे, नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर, नगरसेवक युवराज बावडेकर, श्रीकांत शिंदे, राजू जाधव यांच्यासह श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान, भाजप, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदू एकता, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांसह अन्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
धर्मांतरास प्रोत्साहन देणार्यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघणे संतापजनक ! – नितीन शिंदे
या प्रसंगी माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले, ‘‘राज्यात ठिकठिकाणी धर्मांतरबंदीसाठी कायदा करावा या मागणीसाठी मोर्चे निघत असतांना धर्मांतरास प्रोत्साहन देणार्यांच्या समर्थनार्थ मोर्चा निघणे संतापजनक आहे. पोलिसांनी कोणत्याही परिस्थितीत या मोच्र्यास अनुमती देऊ नये.’’