५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पुणे येथील चि. श्राव्या चैतन्य राठी (वय २ वर्षे ३ मास) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. श्राव्या चैतन्य राठी ही या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

(श्राव्या म्हणजे ‘सुमधुर स्वर’)

चि. श्राव्या राठी

मूळची नाशिक येथील आणि सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेली चि. श्राव्या चैतन्य राठी हिची आई आणि आजी यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

१. सौ. धनश्री चैतन्य राठी (चि. श्राव्याची आई), नाशिक

सौ. धनश्री राठी

१ अ. गर्भधारणेपूर्वी : ‘माझी गर्भधारणा होण्यात अडचणी होत्या. त्यामुळे मला आधुनिक वैद्यांचे उपचार घ्यावे लागले. तेव्हा माझ्याकडून आपोआप आतून श्रीकृष्णाला कळवळून प्रार्थना होत असे.

१ आ. गर्भारपण

अ. आम्ही घरातील सर्व स्त्रिया संध्याकाळी एकत्र येऊन रामरक्षा, देवीकवच, मारुति स्तोत्र, भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय आणि हनुमान चालिसा म्हणत होतो. रामरक्षा म्हणतांना बाळाची हालचाल होत होती आणि मलाही पुष्कळ चांगले वाटायचे.

आ. माझ्यानंतर लगेच माझ्या लहान जावेला (सौ. श्रुती राठी हिला) दिवस राहिले. आम्ही दोघी एकमेकींशी नेहमी आध्यात्मिक विषयावरच बोलायचो. आम्हा दोघींना ‘आपल्याला सात्त्विकच बाळ व्हावे’, असे वाटायचे.

इ. मला गरोदरपणात सनातनचे बालसंस्कारवर्ग ऐकायला पुष्कळ आवडायचे. मी भगवद्गीता, भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी (सार) या ग्रंथांचे वाचनही केले.

ई. प्रसूतीच्या वेळी माझा अखंड नामजप चालू होता.

१ इ. जन्मानंतर

अ. ‘बाळाचे नाव ‘श्राव्या’, असे ठेवले. श्राव्या लहानपणापासूनच सात्त्विक आहे.

आ. चि. श्राव्या सव्वा महिन्याची असतांना ती ‘ॐ’ म्हणण्याचा प्रयत्न करायची.

१ ई. देवाची आवड

अ. श्राव्या सकाळी उठल्यावर श्रीकृष्णाच्या चित्राला नमस्कार (तिच्या भाषेत जय) करते. आम्ही कधी विसरलो, तर ती स्वतःहून आम्हाला नमस्कार करण्याची आठवण करून देते.

आ. तिला प्रतिदिन आजीच्या समवेत देवपूजा करायला आवडते. पूजा करतांना ती प्रत्येक देवाची मूर्ती हातात घेऊन स्वतःच्या आणि आजीच्या कपाळावर लावून नमस्कार करते.

इ. श्राव्या सकाळी ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजप ऐकतांना ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाच्या वेळी ती अनुक्रमे ‘ॐ, ॐ’ अन् ‘दत्त, दत्त’, असा उच्चार करते.

१ उ. श्राव्याला कुणी कधी रागावले, तर ती छान हसते. त्यामुळे समोरची व्यक्ती राग विसरते.

२. सौ. नीलम महेशकुमार राठी (चि. श्राव्याची चुलत आजी (श्राव्याच्या वडिलांची काकू), वय ५० वर्षे)

अ. श्राव्याकडे पाहून ती हिंदु राष्ट्राची रणरागिणी वाटते.

(सर्व सूत्रांचा दिनांक ३.५.२०२२)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.