तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचे शवविच्छेदनातून उघड !

देहलीतील तरुणीच्या अपघाताचे प्रकरण

देहली – येथील कांझावाला भागामध्ये एका तरुणीला चारचाकी वाहनाने १२ किलोमीटर फरफटत नेल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण देशात संतप्त भावना आहेत. या तरुणीच्या करण्यात आलेल्या शवविच्छेदनातून तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे समोर आले आहे. तरुणीच्या नातेवाइकांनी ती शेवटी विवस्त्र सापडल्याने या संदर्भात संशय व्यक्त केला होता.

१. या घटनेच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. विशेष पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, घटनेच्या रात्री तरुणीची मैत्रीणही तिच्या समवेत होती. अपघाताच्या वेळी तिला कोणतीही दुखापत झाली नाही आणि ती तेथून निघून गेली. तिच्याशी पोलिसांनी संपर्क साधला असून ती घाबरल्याने तिने पोलिसांना संपर्क केला नाही. ही घटना एक अपघात आहे, असेही तिने सांगितले.

२. न्यायप्रयोगशाळेच्या अधिकार्‍यांना अपघात झालेल्या चारचाकीच्या आतमध्ये तरुणीचे रक्त सापडले नाही. त्यामुळे ती वाहनात नव्हती, असे म्हटले जात आहे.

३. मृत तरुणी आणि तिची मैत्रीण ३१ डिसेंबरच्या रात्री एका उपाहारगृहात गेले होते. तेथे ते एका खोलीत काही घंटे थांबले होते. त्या वेळी त्यांच्यात भांडण झाले होते, असे या उपाहारगृहाच्या व्यवस्थापकाने सांगितले. त्या दोघी रात्री दीडच्या सुमारास तेथून निघाल्या तेव्हाही भांडत होत्या, असेही त्याने सांगितले.