‘सर्वसाधारणतः साधकांना स्वतःच्या नेहमीच्या सेवा (उदा. ग्रंथसंकलन, संगणकावर चित्रे सिद्ध करणे) करायला आवडतात. त्यामुळे ते या सेवा मनापासून करतात. या सेवांमध्ये त्यांच्या मनाचा सहभाग चांगला असल्याने त्यांच्याकडून सेवा करतांना भावाच्या स्तरावर प्रयत्नही होतात. त्यामुळे त्यांना सेवेतून अधिक चैतन्य ग्रहण करता येते; मात्र काही साधक आश्रम स्वच्छतेची सेवा, आजारी किंवा वयस्कर यांची सेवा इत्यादी सेवा ‘सेवा सांगितली आहे म्हणून करणे’, अशा रितीने करतात. यामध्ये त्यांच्या मनाचा सहभाग तेवढा नसल्याने त्यांच्याकडून सेवेत भावाच्या स्तरावर विशेष प्रयत्न होत नाहीत, तसेच ‘ही सेवा अधिकाधिक चांगली कशी करू ?’, याविषयी त्यांना सुचतही नाही. त्यामुळे अशा सेवांमधून ते अपेक्षित असे चैतन्य ग्रहण करू शकत नाहीत. याचाच अर्थ, सेवा करण्याचा उद्देशच सफल होत नाही. साधकांनी ‘आपल्याकडून असे घडत नाही ना ?’, याचा अंतर्मुख होऊन विचार करावा.
कोणतीही सेवा करतांना ‘देव या सेवेतून माझा प्रेमभाव आणि सेवाभाव वाढवणार आहे’, ‘देव या सेवेतून माझा मनोलय आणि बुद्धीलय करवून घेणार आहे’ इत्यादी दृष्टीकोन ठेवल्यास त्या सेवेत मनाचा सहभाग वाढून ती सेवा भावपूर्ण होण्यास साहाय्य होते.’
– (पू.) संदीप आळशी (१४.१२.२०२२)