देहलीमध्ये चारचाकी गाडीने तरुणीला धडक देऊन १२ किलोमीटर फरफरटत नेल्याने तिचा मृत्यू

  • पाचही आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी

  • पोलिसांचे म्हणणे ‘हा अपघात’, तर तरुणीच्या नातेवाइकांचा ही हत्या असल्याचा आरोप !

नवी देहली – येथील कांझावाला भागात ३१ डिसेंबरच्या रात्री एका चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील तरुणी गाडीच्या खाली आली आणि तिला तसेच १२ किलोमीटर फरफटत नेण्यात आले. यात ती पूर्ण निर्वस्त्र झाली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गाडीतील पाचही जणांना अटक केली असून त्यांना ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. ही घटना अपघात असल्याचे पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती म्हणत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे; मात्र तरुणीच्या नातेवाइकांनी ही जाणीवपूर्वक केलेली हत्या असल्याचा आरोप करत ‘मुलीवर अतिप्रसंग झाला आहे का ?’, हेही शोधण्यास सांगितले आहे. ‘आरोपी दीपक खन्ना, अमित खन्ना, मिथुन, कृष्णा आणि मनोज मित्तल दारूच्या नशेत होते कि नाही ?’, हे पडताळण्यासाठी त्यांच्या वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत.

१. याप्रकरणी देहली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी म्हटले की, हे प्रकरण अतिशय धोकादायक आहे. मी देहली पोलिसांना आयोगासमोर उपस्थित रहाण्याचे समन्स बजावत आहे. संपूर्ण सत्य समोर आले पाहिजे.

२. पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, हे संपूर्ण प्रकरण अपघाताचे आहे. अपघातामुळे मुलीच्या शरिराला दुखापत झाली. रक्तस्त्राव झाला. हा लैंगिक अत्याचार किंवा खून असल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

पोलिसांना अपघाताची माहिती देऊनही कारवाई नाही ! – प्रत्यक्षदर्शीचा आरोप

पोलिसांचे बिनतारी संदेश वाहन असणार्‍या गाडीतील पोलिसांना अपघाताची माहिती देऊनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप प्रत्यक्षदर्शी दीपक यांनी केला आहे. दीपक यांनी सांगितले, ‘मी पहाटे ३.१५ वाजता दूध वितरणासाठी जात होतो. तेव्हा मी चारचाकी गाडी महिलेला फरफटत नेत असल्याचे पाहिले. मी बेगमपूरपर्यंत या वाहनाचा पाठलाग केला. मी पोलिसांना दूरभाष केल्यानंतर पहाटे ५ पर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.’ (याविषयी सखोल चौकशी करून त्यात तथ्य असेल, तर संबंधित पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक ! – संपादक)