नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सदैव प्रेरणास्रोत असलेल्या मातोश्री हिराबेनजी मोदी यांच्या निधनाने मोदीजींच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे जाणे सर्वांसाठी दुःखद आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० डिसेंबर या दिवशी हिराबांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ‘‘हिराबा १०० वर्षे सेवाव्रती आणि संघर्षमय जीवन जगल्या. त्यातूनही त्यांनी मोदी यांच्यावर जे संस्कार केले त्यातून देशाला कणखर, प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व मिळाले.’’
फडणवीस म्हणाले की, वयाच्या १०० व्या वर्षीही कुठलेही काम बुद्धीने आणि मनाच्या शुद्धीने करण्याची शिकवण त्या देतात. यावरून त्यांचा कणखरपणा दिसून येतो. मोदीजी आणि आणि हिराबा यांचे आत्मीयतेचे नाते होते. जेव्हा जेव्हा मोदीजी त्यांना भेटायला जायचे, तेव्हा तेव्हा दृढ आणि तेवढ्याच प्रेमळ हिराबा आपणा सर्वांना पहायला मिळत होत्या. अशा मातांमुळे आपला देश महान आहे. आईसमवेत नसणे, हे जगातील सर्वांत मोठे दुःख असते. मोदीजी, त्यांचे कुटुंब आणि स्नेही यांना या दु:खातून सावरण्याचे बळ मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !, अशा शब्दांत त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.