पोलीस सेवा निवासस्थान प्रकल्पाच्या कालबद्ध कार्यक्रमाला गती देणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

विधान परिषद प्रश्नोत्तरे…

श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

नागपूर, २९ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील पोलीस सेवा निवासस्थान प्रकल्प बांधकामाचा कालबद्ध कार्यक्रम राज्यशासनाने हाती घेतला आहे. यामध्ये प्राधान्यक्रम निश्चित करून प्रकल्पाला गती देणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या घंट्यांत दिली. संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलीस वसाहतीची दुरवस्थेविषयीचा प्रश्न सदस्य सतीश चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पोलीस सेवा निवासस्थान प्रकल्पाचा बृहद आराखडा यापूर्वी सिद्ध करण्यात आला आहे. त्यासाठी २ सहस्र कोटी रुपये उपलब्ध केले होते. कोरोनामुळे हे प्राधान्यक्रम ठरवता आले नाहीत; मात्र आता प्राधान्यक्रम ठरवण्याचे काम हाती घेतले आहे. या प्राधान्यक्रमात संभाजीनगर येथील पोलीस वसाहतींचाही समावेश केला जाईल. या प्रकल्पाला मोठा निधी लागणार असून राज्यशासन या प्रकल्पाला गती देणार आहे.