शस्त्रास्त्रे आणि ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ वाहून नेणारी पाकिस्तानी नौका कह्यात !

भारतीय तटरक्षक दलाची मोठी कारवाई

कर्णावती (गुजरात) – भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या समुद्रात केलेल्या कारवाईत मोठे यश प्राप्त केले आहे. गुजरात आतंकवादविरोधी पथकाच्या साहाय्याने   राबवलेल्या एका संयुक्त मोहिमेत भारतीय तटरक्षक दलाने शस्त्रास्त्रे आणि ३०० कोटी रुपयांचे ४० किलो अमली पदार्थ घेऊन आलेली पाकिस्तानी नौका गुजरातच्या किनार्‍यावर कह्यात घेतली. या कारवाईत १० पाकिस्तानी घुसखोरांना अटक करण्यात आले आहे. गुजरात आतंकवादविरोधी पथकाला याविषयीची गुप्त माहिती मिळाली होती.

पाकिस्तानी घुसखोरांनी शस्त्रास्त्रेे आणि अमली पदार्थ घेऊन सागरी सीमेवरून गुजरातच्या समुद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. भारताच्या आंतरराष्ट्रीय समुद्री सीमेवर  पाळत ठेवून असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या सैनिकांनी पाकिस्तनची ‘अल् सोहेली’ नावाची नौका भारतीय समुद्री हद्दीत ओखा येथे कह्यात घेतली. यानंतर तटरक्षक दलाच्या  सैनिकांनी नौकेवरील सर्व घुसखोरांना ओखा बंदरावर आणले. मागील १८ मासांमध्ये  गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी मिळून केलेली ही  सातवी संयुक्त कारवाई आहे. सागरी सीमेवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रेे आणि अमली पदार्थ जप्त करण्याची ही पहिली वेळ आहे.

संपादकीय भूमिका

भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांचे वाढते जाळे नष्ट करण्यासाठी पाकला संपवणे आवश्यक !