सर्वसमावेशक हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करूया ! – सद्गुरु कु. स्वाती खाडये

सातारा येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’द्वारे हिंदुत्वाचा हुंकार !

सभेत बोलतांना सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये

सातारा, २६ डिसेंबर (वार्ता.) – जर भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व आहे, तर सर्व धर्मियांना समान वागवले गेले पाहिजे; परंतु भारतात अल्पसंख्यांकांना संरक्षण, तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पूर्णत: शासकीय अनुदानातून चालणार्‍या शिक्षण संस्थांमध्ये कुठलेही धार्मिक शिक्षण देता येणार नाही, हे तत्त्व मान्य करायचे असेल, तर ते सर्वांसाठी लागू हवे; मात्र येथेही हिंदूंशी भेदभाव केला गेला आहे. यामुळे शासकीय अनुदानातून हिंदू वगळून अन्य धर्मियांना त्यांचे धर्मशिक्षण देण्यासाठी मदरसे अन् कॉन्व्हेंट शाळा चालू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यघटनेद्वारेच केला जाणारा हा अन्याय दूर करण्यासाठी हिंदूंनी सर्वसमावेशक अशा हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार करूया, असे आवाहन सनातनच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. सातारा येथील गांधी मैदान येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त त्या बोलत होत्या.

या वेळी व्यासपिठावर हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संघटक अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि रणरागिणी शाखेच्या सौ. भक्ती डाफळे उपस्थित होत्या. २ सहस्रांहून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चा लाभ घेतला.

दीपप्रज्वलनाने सभेचा प्रारंभ करतांना डावीकडून सद्गुरु स्वाती खाडये, सौ. भक्ती डाफळे आणि अधिवक्ता नीलेश सांगोलकर

शंखनाद झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर वेदमंत्रपठणाद्वारे ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’ला आरंभ झाला.

हलाल उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा ! – अधिवक्ता निलेश सांगोलकर

हलाल ही इस्लामिक संकल्पना निधर्मी म्हणवणार्‍या भारतातील ७८ टक्के हिंदूंवर थोपवली जात आहे. भारतामध्ये सरकारचे प्रमाणपत्र देणारे स्वतंत्र अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, तसेच अन्न आणि औषध प्रशासन हे विभाग आहेत. तरीही ‘जमियत उलेमा ए हिंद’, ‘हलाल ट्रस्ट’ यांसारख्या खासगी मुसलमान संस्था भारतीय उत्पादकांकडून सहस्रो रुपये घेऊन ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे भाग पाडत आहेत. जागतिक स्तरावर हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा आतंकवादासाठी उपयोगात आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था आणि सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्‍या हलाल उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा.

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा व्हावा ! – सौ. भक्ती डाफळे, रणरागिणी शाखा, हिंदु जनजागृती समिती

कायद्याचा धाक न राहिल्यामुळेच आज महाराष्ट्रात ‘श्रद्धा वालकर’, ‘रूपाली चंदनशिवे’ यांसारखी प्रकरणे घडत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु युवती भरकटल्या असून त्या लव्ह जिहादसारख्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर महाराष्ट्र विधीमंडळात ‘लव्ह जिहाद विरोधी’ कायदा झालाच पाहिजे.

हिंदु जनजागृती समितीच्या सातारा येथील कार्याचा आढावा समन्वयक श्री. हेमंत सोनवणे यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि अभारप्रदर्शन सौ. रूपाली महाडिक अन् श्री. राहुल कोल्हापुरे यांनी केले.

क्षणचित्रे

१. सकाळी सभास्थळी स्वच्छता करतांना २ वेळा पक्षीराज गरुड याचे दर्शन झाले.

२. सभास्थळी विविध संस्था आणि संघटना यांची ग्रंथप्रदर्शने होती.

३. सभा झाल्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. काही महिलांनी उपनगरांमध्ये छोट्या सभा आयोजित करण्यासाठी समितीला निमंत्रित केले.

४. जिल्हा स्तरावर घेण्यात येणार्‍या आंदोलनात सहभागी होण्यासाठी वक्त्यांच्या आवाहनानंतर भ्रमणभाषच्या विजेरीच्या प्रकाशात दाखवून उपस्थितांनी अनुमोदन दिले !

हिंदु राष्ट्र-जागृती सभेला उपस्थित संत आणि मान्यवर

पंचनाम दशनाम जुन्या आखाड्याचे पू. सोमनाथगिरी महाराज, महानुभव पंथाचे पू. वेळापुरे महाराज, इस्कॉनचे पू. पंडूनंदन प्रभूजी, श्री योग वेदांत सेवा समितीचे श्री. दीपक केसकर, वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. कृष्णराव क्षीरसागर महाराज, हिंदु महासेभेचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख कार्यवाह अधिवक्ता श्री. दत्तात्रय सणस, हिंदु महासभा कार्यकारिणी सदस्य श्री. उमेश गांधी, विश्‍व हिंदु परिषदेचे सातारा शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडेकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अमर बेंद्रे

हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठी यांच्याकडून लाभले सहकार्य…!

सातारा नगरपालिका, श्री पंचपाळी हौद दुर्गामाता मंदिर ट्रस्ट, श्री वेदांत विद्यापीठ, कृष्णात हॉटेल, नगरसेवक मनोज शेंडे, नगरसेवक विजयकुमार काटवटे, सर्वश्री जितेंद्र वाडेकर, अमर बेंद्रे, दीपक शिंदे, आशिष निकम, प्रसाद पवार, अभिजित भोसले, संकेत शिंदे, हरिभाऊ साळुंखे, सचिन मोहिते, योगेश कुलकर्णी, रमेश हलगेकर, जोतीराम साळुंखे, बळवंत यादव, रमेश साळुंखे, पाटेश्‍वर मार्बल, हसमुख पटेल, अमोल पवार, विशाल शिंदे, मधुकर जाधव, सौ. अर्चना उपाध्ये