सानपाडा (नवी मुंबई) येथे रेल्वे प्रवासी भजन मंडळांची भजन स्पर्धा पार पडल्या !

मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

नवी मुंबई, २२ डिसेंबर (वार्ता.) – नवविधी भक्ती सेवा समितीच्या वतीने सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्र येथे रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या भजन स्पर्धांचा कार्यक्रम पार पडला. नवविधी भक्ती सेवा समितीच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण पूजा, दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वेतून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या २० प्रवासी भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले. या प्रसंगी व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, गायत्री चेतना केंद्राचे विश्वस्त मन्नुभाई पटेल यांनी भजनी मंडळांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास सानपाडा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख मिलिंद सूर्यराव, उपशहर प्रमुख सोमनाथ वास्कर, शाखाप्रमुख अजय पवार, अतुल डेरे आणि कार्यकर्ते यांचे विशेष साहाय्य मिळाले.