गेवराई (जिल्हा बीड), २२ डिसेंबर (वार्ता.) – झारखंड सरकारने अध्यादेशाद्वारे सम्मेद शिखरजी क्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्याचा जैन समाजाने भारतभर मूक मोर्च्याद्वारे निषेध व्यक्त करत सरकारच्या निर्णयावर अप्रसन्नता व्यक्त केली. गेवराई तालुक्यातील जैन समाजाच्या सर्व लोकांनी काळ्या फीती लावून या निर्णयाचा जाहीर निषेध व्यक्त केला. आपापली दुकाने आणि कामकाज दिवसभरासाठी बंद ठेवले. या निषेध मोर्च्यामध्ये सहस्रो जैन बांधव उपस्थित होते.
अतीप्राचीन इतिहास असलेल्या या क्षेत्राची जगभर ख्याती असून पर्यटन क्षेत्र घोषित करून येथील पावित्र्य नष्ट करण्याचा सरकारचा मानस जैन समाज कधीही सहन करणार नाही, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.
या वेळी कचनेर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ऋषभ गंगवाल, पंचालेश्वर जैन मंदिरचे अध्यक्ष गौतमचंद काला, आदिनाथ जैन मंदिर, गेवराईचे अध्यक्ष बाहुबली जैन, सचिव रवींद्र गंगवाल यांच्यासह मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते.
सातारा येथील जैन समाजाने काढली निषेध फेरी !
सातारा, २२ डिसेंबर (वार्ता.) – झारखंड सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा निषेध व्यक्त करण्यासाठी जैन समाजाने शहरातून फेरी काढली. जैन समाजातील व्यापारी वर्गानेही दुकाने बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला. निषेध फेरीनंतर जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना जैन समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.