विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हिंदु जनजागृती समितीला आश्‍वासन !

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. सुनील घनवट

नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिवाची बाजी लावून गड आणि दुर्ग जिंकले आहेत. आम्ही कायद्याची बाजू लावून धरून गडांवरील अतिक्रमणे हटवूच. अनधिकृत बांधकाम करणार्‍यांकडून विरोध होत असला, तरी असेत बांधकाम हटवण्याचा सरकारचा निर्धार आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले.

राज्यातील विविध गड आणि दुर्ग यांंवर झालेली अतिक्रमणे हटवण्याच्या संदर्भात ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यांचे राज्य संघटक तथा ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट यांनी २२ डिसेंबर या दिवशी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्या वेळी श्री. मुनगंटीवार यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे उपस्थित होते.

कितीही धमक्या मिळाल्या, तरी अतिक्रमणे हटवणारच !

गड आणि दुर्ग यांवरील अतिक्रमणे हटवणार्‍या वनविभागाच्या अधिकार्‍यांना काही धर्मांध आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून धमक्या मिळत असल्याकडे लक्ष वेधले असता मुनगंटीवार म्हणाले, ‘‘कितीही धमक्या आल्या, तरी आम्ही अतिक्रमणे हटवणारच आहोत. धमक्या देणार्‍यांवरही आम्ही कारवाई करू. विशाळगडावर शासकीय योजना राबवून अतिक्रमण झाले असेल, तर ते गंभीर आहे.’’

अफझलखानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण हटवल्यासाठी मुनगंटीवार यांचे अभिनंदन !

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या थडग्याभोवतीचे वर्षानुवर्षे ‘संरक्षित’ केलेले अतिक्रमण प्रशासनाने हटवले आहे. या संदर्भात श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अभिनंदनही करण्यात आले.