श्रीराम हे खरे मर्यादापुरुषोत्तम, आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पुत्र, एकपत्नी-एकवचनी अवतारी पुरुष होय ! – पू. संजयगुरुजी

‘श्रीरामायण-एक चिंतन’ या प्रवचनमालेत मार्गदर्शन करतांना पू. संजयगुरुजी

मिरज, १९ डिसेंबर (वार्ता.) – भारताची वैशिष्ट्ये त्याच्या नावातच लपलेली आहेत. ‘भा’ म्हणजेच भक्ती, विवेक आणि तेज यामध्ये ‘रत’ म्हणजेच मग्न असलेल्या चारित्र्यसंपन्न लोकांचा म्हणजेच ‘साधना करणारे साधक’ यांचा देश म्हणजे भारत होय. प्रभु श्रीराम हे खरे मर्यादापुरुषोत्तम, आदर्श राजा, आदर्श पती, आदर्श पुत्र, एकपत्नी-एकवचनी अवतारी पुरुष होय, असे मार्गदर्शन ‘श्री संत सेवा संघा’चे संस्थापक पू. संजयगुरुजी यांनी केले. ते विद्यामंदिर प्रशाला येथे १५ ते १९ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘श्रीरामायण-एक चिंतन’ या प्रवचनमालेत बोलत होते.

१. साधना ही नेहमी मार्गदर्शन घेऊन केली जाते आणि त्याची फलनिष्पत्ती ही नेहमी ईश्वरप्राप्तीकडे नेते.

२. आजकालच्या दूरदर्शन आणि सामाजिक माध्यमे यांद्वारे सादर केल्या जात असलेल्या मालिका या समाजाच्या अधःपतनाला आमंत्रण देत आहेत. भगवान श्रीराम आणि रामायण हे चिरंतन सत्य असून हेच चारित्र्यसंपन्न, दैदिप्यमान समाज आणि राष्ट्र घडवण्यासाठी एकमेवाद्वितीय वाङ्मय आहे.

क्षणचित्रे

१. व्यासपिठावर श्रीराम-सीता, पंचायतन मूर्ती, तसेच महर्षि वाल्मिकी यांचे चित्र यांसह केलेली भावपूर्ण आणि आकर्षक मांडणी ऐकणार्‍यांना रामायणाच्या भावविश्वात घेऊन जात होती.

२. येथे लावण्यात आलेल्या श्री ज्ञानेश्वरी आणि श्री तुकाराम महाराजांचे अभंग यांवर आधारित ‘आत्मज्ञान चित्र प्रदर्शना’मुळे अनेकांना विशेष ज्ञान मिळाले.