संस्कृत व्याकरणकार पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’ भाषा ग्रंथातील नियमांचे कोडे सोडवण्यात भारतीय विद्यार्थाला यश !

आता संगणकामध्येही पाणिनीचे व्याकरण वापरता येणे शक्य !

भारतीय विद्यार्थी डॉ. ऋषी राजपोपाट

नवी देहली – संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांनी ख्रिस्ताब्द पूर्व ५ व्या शतकात, म्हणजे २ सहस्र ५०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘अष्टाध्यायी’मधील व्याकरणाच्या संदर्भातील एक चूक अमेरिकेतील केंब्रिज विद्यापिठात ‘पी.एच्.डी’चे शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी डॉ. ऋषी राजपोपाट यांनी सुधारली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. डॉ. राजपोपाट यांनी सुधारलेली चूक ही क्रांतीकारी असल्याचे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे संगणकामध्ये प्रथमच पाणिनीचे व्याकरण वापरता येणार आहे. ‘अष्टाध्यायी’मधील व्याकरणाच्या नियमांचा वापर संगणकातील ‘नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग’ (एन्.एल्.पी.) या प्रणालीसाठीही (सिस्टीमसाठीही) करता येईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

डॉ. राजपोपाट यांनी म्हटले की, पाणिनीला ‘नियम शब्दाच्या डावीकडे वापरावा  कि उजवीकडे वापरावा ?’, याविषयी सांगायचे होते. उजवीकडील शब्दानुसार नियम वापरावा, असा या ‘मेटा रुल’चा (नियमांचा नियम) अर्थ आहे. हा नियम वापरला, तर ‘अष्टाध्यायी’ हे अगदी अचूक भाषा निर्माण करणारे यंत्र असल्याचे लक्षात आले. नियम अशापद्धतीने वापरल्यास प्रत्येकवेळी यामधून अचूक संस्कृत शब्द आणि वाक्य निर्माण करतात येतात. मानव आणि यंत्र यांमधील संवादाच्या क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण शोध असेल, तसेच तो भारतातील ऐतिहासिक बृद्धीमत्तेला अधोरेखित करणाराही असेल.

डॉ. राजपोपाट यांनी सुधारलेली चूक !

‘अष्टाध्यायी’ ग्रंथ संस्कृत भाषेमागील विज्ञान समजावून सांगतो. या ग्रंथामधील माहितीच्या आधारे ‘एखादा शब्द कसा सिद्ध करावा ?’, तसेच ‘संस्कृतमधील वाक्य कसे सिद्ध करावे ?’, यांविषयी मार्गदर्शन केले जाते; मात्र यामध्येही बर्‍याचदा पाणिनीचे दोनहून अधिक नियम एकाच वेळी वापरले जायचे आणि त्यामुळे संभ्रम निर्माण व्हायचा. हा गोंधळ टाळण्यासाठी पाणिनीने ‘मेटा रुल’, म्हणजेच (नियमांचा नियम) लिहून ठेवला आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये हा नियम ‘दोन समान दर्जाचे नियम वापरतांना संभ्रम निर्माण झाला, तर जो नियम ‘अष्टाध्यायी’मध्ये नंतर लिहिण्यात आला आहे, तो प्राधान्यक्रमाने वापरावा’, असा आहे. डॉ. राजपोपाट यांनी त्यांच्या ‘पीएच्डी’च्या ‘इन पाणिनी वी ट्रस्ट’ नावाच्या प्रबंधामध्ये ‘मेटा रुल’चे कोडे सोडवले आहे. ‘पाणिनीच्या सूत्रांचा साधा आणि समजेल असा अर्थ काढावा, जो शब्दांशी अधिक प्रमाणित असेल’ असे डॉ. राजपोपाट यांचे म्हणणे आहे.