धर्मांतर, लव्ह जिहाद आणि गोवंश रक्षण यांविषयी गावोगावी जाऊन केली जागृती !

विश्‍व हिंदु परिषदेचे सदस्यता मोहीम अभियान !

  • दीड लाख गावांत संपर्क साधून बनवणार १ कोटी हितचिंतक !

  • आतापर्यंत १ लाख गावांतून बनवले ६२ लाख हितचिंतक !

नागपूर – विश्‍व हिंदु परिषदेने ६ नोव्हेंबरपासून संपूर्ण देशात आरंभिलेल्या हितचिंतक, म्हणजेच ‘सदस्यता मोहीम अभियाना’च्या अंतर्गत धर्मांतर, लव्ह जिहाद, गोवंश रक्षण आदींविषयी गावोगावी जाऊन जागृती करण्यात आली. विहिंप, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विदर्भातील गावांतील घरोघरी जाऊन २० रुपये नोंदणी शुल्क घेऊन हितचिंतक नोंदणी केली आहे. संपूर्ण भारतातील दीड लाख गावांत अशा प्रकारे संपर्क साधून १ कोटी हिंतचिंतक जोडण्यात येणार होते. आतापर्यंत १ लाख गावांत संपर्क साधून ६२ लाख हितचिंतक बनवण्यात आले आहेत, अशी माहिती विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी १३ डिसेंबर या दिवशी येथे दिली.

मिलिंद परांडे पुढे म्हणाले की,

१. ३० आणि ३१ डिसेंबर २०२२, तसेच १ जानेवारी २०२३, असे ३ दिवस मध्यप्रदेशातील इंदूर येथे आयोजित बैठकीत संपूर्ण देशातील कार्याचा आढावा घेण्यात येईल. या ६२ लाख हितचिंतकांमध्ये १२ लाख महिला, तर ३० लाखांहून अधिक युवक आहेत. यापूर्वी वर्ष २०२१ मध्ये ३० लाख हितचिंतक नोंदणी झाली आहे.

२. या अभियानाच्या निमित्ताने विहिंपचे केंद्रीय महामंत्री मिलिंद परांडे, संघटन महामंत्री विनायकराव देशपांडे आणि क्षेत्रीय संघटन मंत्री श्रीरंग राजे यांनी देशभर प्रवास केला असून बैठका, तसेच कार्यकर्ता मेळावे आयोजित करण्यात आले होते.

३. १५ वर्षांवरील प्रत्येकाला हितचिंतक बनवण्यात आले. अभियानांतर्गत प्रत्येक जात, धर्म आणि पंथ यांच्या लोकांशी संपर्क साधला जाणार आहे. हे लोक हिंदु समाज आणि राष्ट्रहित यांच्या कार्याशी जोडले जातील.

अभियानाचा उद्देश !

या अभियानाद्वारे विहिंपकडून तरुण पिढीला धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्यात आली. सेवा कार्यापासून वंचित समाजाला जोडणे, सनातनचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोचवणे, गायींचे रक्षण करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे, सामाजिक एकोपा निर्माण करणे आणि हिंदु समाजाच्या रक्षणासाठी निर्धाराची भावना निर्माण करणे, हे या अभियानाचे उद्देश आहेत.