प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरून दिली माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – सर्वच परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांच्या फुटीच्या प्रकरणात दोषींना शिक्षा देण्यासाठी जलद गती न्यायालयांची स्थापना केली जाईल. देशातील तरुणांचे हित आणि त्यांचे भविष्य हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणार्‍यांना सोडले जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी जंतरमंतर येथे चालू असलेल्या कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी ही माहिती प्रसारित केली आहे.

तुम्हीच तरुणांच्या भविष्याची सर्वाधिक हानी केली ! – राहुल गांधी यांची टीका

या लिखाणानंतर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर म्हटले की, तुम्हीच तरुणांच्या भविष्याची सर्वाधिक हानी केली आहे. तुम्ही शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त होऊ दिली आणि यासाठी उत्तरदायी असलेल्या व्यक्तींना संरक्षण दिले.

देहलीतील टॉलस्टॉय मार्गावर आंदोलकांकडून पुन्हा हिंसाचार : पोलिसांकडून लाठीमार

जंतरमंतर येथे चालू असलेल्या आंदोलनात २२ जुलैला रात्री पुन्हा हिंसाचार झाला. टॉलस्टॉय मार्गावर आंदोलकांनी पोलिसांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली, तसेच त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी लाठीमार केला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार जंतरमंतर येथे ४ सहस्र लोकांची क्षमता असतांना तिथे अनुमाने १२ सहस्र लोक जमले होते. यामुळे ही गर्दी टॉलस्टॉय मार्ग आणि संसद मार्ग येथे पसरली.

देहली पोलिसांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, कनॉट प्लेस येथील टॉलस्टॉय मार्गाजवळ रात्री साडेआठच्या सुमारास हा हिंसाचार झाला. तेथे काही समाजकंटकांनी पोलिसांवर दगड आणि बाटल्या यांद्वारे आक्रमण केले. यात कनॉट प्लेसचे साहाय्य पोलीस आयुक्त विवेक भगत घायाळ झाले. वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्यांना उपचारासाठी राम मनोहर लोहिया रुग्णालयात भरती केले. काही मिनिटे परिस्थिती तणावपूर्ण होती; परंतु आता तेथे पूर्ववत् शांतता आहे.

अधिकार्‍यांनी सांगितले की, सुरक्षा कर्मचार्‍यांनी प्रारंभी आंदोलकांना शांततेत पांगण्याची विनंती केली. पोलिसांनी कॉकरोच जनता पक्षाचे नेते आणि आयोजक यांनाही घटनास्थळी बोलावून जमावाला शांतता राखण्याचे आवाहन करण्यास सांगितले; परंतु आंदोलकांनी त्यांच्या स्वतःच्या आयोजकांच्या आवाहनाकडेही दुर्लक्ष केले.

आंदोलकांकडे काठ्या अन् तलवारी

हिंसाचार वाढल्यानंतर सुरक्षा कर्मचार्‍यांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या चकमकीत काही आंदोलक काठ्या घेऊन आले होते, तर काही जण तलवारी दाखवून धमकावत होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी मर्यादित बळाचा वापर केला. (यावर काँग्रेस, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष आदी तोंड का उघडत नाहीत ? कि हे योग्य आहे त्यांना म्हणायचे आहे ? – संपादक)

भाजपचे गुंड दगडफेक करत आहेत ! – अभिजित दीपके यांचा आरोप

कॉकरोच पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, भाजपने पाठवलेले गुंड आंदोलकांमध्ये येऊन दगडफेक करत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने सकाळी देहलीतील १६ मेट्रो स्थानके बंद केली. यात सर्वाेच्च न्यायालय मेट्रो स्थानकाचाही समावेश आहे. हे प्रकरण आता भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर पोचले. सरन्यायाधीश म्हणाले की, आवश्यकता भासल्यास मी हस्तक्षेप करेन.

आश्वासन मिळाल्यास आजच उपोषण सोडू ! – सोनम वांगचुक

सोनम वांगचुक

हरियाणाच्या गुरुग्राममधील मेदांत रुग्णालयात जंतरमंतर येथील उपोषणामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाने भरती करण्यात आलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, उपोषणालो २५ दिवस उलटले आहेत; पण मी अजूनही जिवंत आहे. काही खासदार मला भेटायला आले, त्यांनी उपोषण संपवण्याची विनंती केली. मला जर सरकारकडून आश्वासन मिळाले, तर मी आजच उपोषण संपवायला सिद्ध आहे. केवळ सरकारने विद्यार्थ्यांविरोधात कारवाई करू नये.’

२२ जुलैला सायंकाळी आम आदमी पार्टी, झारखंड मुक्ति मोर्चा आणि समाजवादी पार्टी यांच्या १५ खासदारांनी मेदांता रुग्णालयात जाऊन वांगचुक यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र  पोलिसांनी रोखले होते. या वेळी पोलीस आणि खासदार यांमध्ये वाद झाला. संतप्त खासदार प्रवेशद्वारावरच धरणे आंदोलन केले. एक घंटा गदारोळ चालू होता.

आम्ही चर्चेसाठी सिद्ध आहोत ! – केंद्रीय मंत्री नड्डा

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा

दुसरीकडे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, वांगचुक यांनी आम्हाला खुले पत्र लिहिले आहे. आम्ही लवकरच त्या पत्राला उत्तर देऊ. कॉकरोच जनता पक्षाच्या लोकांचे म्हणणेही आम्ही शांतपणे ऐकले. त्यांनी त्यांचे म्हणणे लिहून दिले आहे. आम्ही चर्चेसाठी सिद्ध आहोत. जेव्हा ते सांगतील तेव्हा आम्ही चर्चा करू.

वांगचुक यांनी सरकारकडे ३ मागण्या केल्या आहेत. यात ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना योग्य भरपाई आणि उत्तरदायी निश्चित करण्यासाठी संसदेत सखोल चर्चा व्हावी. शिक्षणमंत्र्यांच्या त्यागपत्रावर विचार करावा.

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये पुन्हा गदारोळ

संसदेत २३ जुलैलाही केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्राच्या मागणीवरून गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही बाजूंच्या खासदारांनी संसदेतील मकर द्वार येथे एकत्र येत त्यांच्या भूमिका मांडल्या. हे आंदोलन संपल्यानंतर खासदार सभागृहांत परतले. लोकसभेचं कामकाज चालू होताच विरोधकांनी गदारोळ केला. धर्मेंद्र प्रधान यांचे त्यागपत्र आणि ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, म्हणजेच राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा) परीक्षा प्रकरणावरून चर्चा व्हावी, ही मागणी त्यांना लावून धरली. परिणामी या गदारोळात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तासाभरासाठी स्थगित केले, तर राज्यसभेतही विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज तासाभरासाठी थांबवावे लागले.

‘कॉकरोच’च्या आंदोलनात खलिस्तानी आतंकवादी पन्नू याचाही प्रवेश

 (म्हणे) ‘मोदी यांना पाडायचे आहे, सत्तापालट होणारच !’

जंतरमंतरवरील आंदोलनात आता अमेरिकेतील खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंतसिंह पन्नु याने प्रवेश केला आहे. त्याने एक व्हिडिओ प्रसारित करून दावा केला आहे की, त्याने कॉकरोच जनता पक्षाच्या (‘सीजेपी’च्या) नेत्यांसोबत ऑनलाईन बैठक केली आहे. यात आंदोलनावर चर्चा झाली. तो म्हणाला की, या बैठकीत सीजेपी आणि मी जी घोषणा केली आहे, ती लक्षात ठेवा. देहलीला आणि मोदी यांना पाडायचे आहे. मोदी यांच्या सत्ता उलथवली जाईल. हा निश्चित उपाय नाही. याचा निश्चित उपाय भारताचे विघटन करणे आहे, भारताला तोडणे आहे.

सीजेपीच्या माजी प्रवक्त्याची अभिजित दीपके यांच्यावर टीका

जंतरमंतरवर आंदोलन चालू असतांना कॉकरोच जनता पक्षाचे प्रवक्ते विजेता दहिया तेथे उपस्थित न रहाता त्यांचा ‘बर्गर’ खातांनाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर त्यांना त्याच्या पदावरून हटवण्यात आले. यावरून दहिया यांनी पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके यांच्यावर आरोप केले आहेत.

ते म्हणाले की, मी जंतरमंतरच्या जवळ ‘बर्गर’ खात असतांना मनुवादी लोकांनी मला जाब विचारला. बर्गरवरून सगळा गदारोळ झाला. मी आंदोलनात पुन्हा जाण्यासाठी सिद्ध होत होतो. त्या वेळी मला अभिजित दीपके यांचा दूरभाष आला. मला अभिजित म्हणाला की, तू घाबरू नकोस. काही हरकत नाही. अशा गोष्टी होतात. अचानक मला तो म्हणाला की, तू आंदोलनात येऊ नको. मी विचारले ‘का नको येऊ?’ तर म्हणाला की, ‘अरे तुझा तो बर्गरवाला व्हिडिओ बराच प्रसारित झाला आहे.’ मी त्याला सांगितले की, लोक टीका करत आहेत, तर ठीक आहे; पण तू तर पहातो आहेस ना, मागच्या २ रात्रींपासून मी तिथे होतो. पोलीस आले, तर काय करायचे हे ठरवत होतो. अभिजित म्हणाला ‘हो’. अभिजिीत, तू कचोरी खात असतांनाचे छायाचित्र प्रसारित झाले होते. त्या वेळी मी तुझी बाजू घेतली. अन्य वेळीही मी तुझी बाजू घेतली होती. मी अशा गोष्टी करत होतो की, ज्याने आंदोलनाला लाभ होईल; मात्र आता अचानक एक दिवस मला कळते की, माझ्याच लोकांनी मला बळीचा बकरा बनवले.


काँग्रेसचे आंदोलन, म्हणजे केवळ राजकीय ‘स्टंट’ !

सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली आंगमो यांचा राहुल गांधी यांच्यावर कठोर टीका

गीतांजली आंगमो आणि राहुल गांधी

काँग्रेसने २ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवास्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावर आता सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेसचे हे आंदोलन पूर्णपणे कपटी आणि राजकीय हेतूने प्रेरित होते. काँग्रेसच्या नेत्यांना खरोखरच विद्यार्थ्यांची काळजी असती, तर त्यांनी पंतप्रधानांच्या घराबाहेर ‘स्टंट’बाजी करण्याऐवजी ते जंतरमंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले असते.

गीतांजली आंगमो यांनी पुढे म्हणाल्या की,

१. राजकीय पक्ष सोनम वांगचुक यांचा लाभासाठी वापर करत आहेत !

राजकारणी आता सोनम वांगचुक आणि त्यांच्या प्रतिमा यांचा स्वतःच्या राजकीय लाभासाठी वापर करत आहेत; पण जनता अन् तरुण वर्ग सुज्ञ असून कुणीही त्यांची फसवणूक करू शकत नाही. हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा विचारसरणीशी जोडलेले नाही.

२. पंतप्रधानांच्या घराबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनात प्रामाणिकपणाचा अभाव होता !

पंतप्रधानांच्या घराबाहेरील काँग्रेसच्या आंदोलनात प्रामाणिकपणाचा अभाव होता. हा जागृत भारत असून जे लोक आंदोलनाचा वापर स्वतःसाठी करतील, त्यांना देशातील तरुण फेकून देतील. आमच्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधी पक्ष असा कोणताही भेद नाही. आमच्यासाठी संसद ही सर्वोच्च संस्था असून संसदेने शिक्षणाकडे मूलभूत आणि सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणून पाहिले पाहिजे.

३. स्वार्थासाठी येणारे लोक स्वतःहून बाजूला पडतील !

कोणताही राजकीय ‘अजेंडा’ (कार्यसूची) न ठेवता या आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या प्रत्येकाचे स्वागत आहे; पण स्वतःच्या स्वार्थासाठी येणारे लोक स्वतःहून बाजूला पडतील.

देहलीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

जंतरमंतर येथील हिंसाचारानंतर देहलीत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि देहलीचे उपराज्यपाल यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार देहलीचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अनुराग कुमार यांना कोणत्याही व्यक्तीला थेट कह्यात घेण्याचा विशेष अधिकार दिला आहे. हा विशेष अधिकार १९ जुलै २०२६ ते १८ ऑक्टोबर २०२६ या ३ महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असेल. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीवर आरोप सिद्ध न करता किंवा खटला न चालवता १२ दिवसांपासून ते १२ मासांपर्यंत पोलीस कोठडीत ठेवता येते.

गेल्या वर्षी २६ सप्टेंबरला लडाखमधील लेहच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या आदेशानंतर आंदोलक सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक करण्यात आली होती. त्यांना तब्बल १७० दिवस स्थानबद्धतेमध्ये ठेवण्यात आले होते.