सातारा, ८ डिसेंबर (वार्ता.) – नुकत्याच झालेल्या चतुर्थ वार्षिक पहाणीनंतर घरपट्टी वाढीच्या नोटिसा वाटप करण्याची प्रक्रिया नगरपालिकेच्या वतीने जवळपास पूर्ण होत आली आहे. प्रक्रिया अपील प्रविष्ट करण्याच्या टप्प्यात असतांना ती तातडीने स्थगित करण्याचे निर्देश स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दूरभाषद्वारे दिले आहेत.
चतुर्थ वार्षिक पहाणी पूर्ण झाल्यानंतर अनुमाने ७२ सहस्रांहून अधिक मिळकतधारकांना घरपट्टी वाढीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांचे वाटप अजूनही चालू आहे. नागरिकांनी वाढीव घरपट्टीविषयी अपील प्रक्रिया पूर्ण करावी. प्रविष्ट हरकतींवर सुनावणी, निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन सर्वसाधारण सभा अस्तित्वात आल्यानंतर घेतल्या जातील, असे संकेत मुख्याधिकारी बापट यांनी दिले आहेत. आतापर्यंत सातारा नगरपालिकेकडे ६ सहस्र १५० अपीले प्रविष्ट झाली आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या दूरभाषला मुख्याधिकारी अभिजित बापट यांचा दुजोरा !
अन्यायकारक वाढीव घरपट्टी आकारणीला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोध दर्शवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनही दिले होते. याची गंभीर नोंद घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी रात्री ११.३० वाजता सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना वाढीव घरपट्टी आकारणी प्रक्रियेला स्थगिती देण्याचे निर्देश दिले. याविषयी मुख्याधिकारी बापट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.