आज कृष्णाशी बोलावे;
म्हणून गेले त्याच्या प्रासादात ।
कृष्ण होता सिंहासनावर
आसनस्थ ।। १ ।।
अनेक जण त्याला नजराणे (भेटवस्तू)
देऊन नमस्कार करीत होते ।
माझे हात रिकामे होते,
त्याला देण्यासारखे माझ्याकडे काहीही नव्हते ।। २ ।।
काही वेळ हा सोहळा मी दुरूनच पाहिला,
त्याला हात जोडून नमस्कार केला ।
आणि माझी पावले माघारी वळली ।। ३ ।।
आज मला त्याच्याशी चार शब्दही नाही बोलता आले ।
मी पायर्या उतरून अंगणात आले ।। ४ ।।
माझ्याच विचारातच चालत होते,
अकस्मात् दृष्टीसमोर दोन सुंदर पावले स्थिरावली ।
माझी दृष्टी त्या पावलांवर खिळली ।। ५ ।।
काही क्षणांनी शब्द ऐकले, परत का गेलीस ।
मी स्तब्ध उभी होते; कारण तो जाणतच होता ।। ६ ।।
तो म्हणाला, ‘मी तुला फार मोठी भेट देणार होतो’ ।
मी म्हणाले, ‘तुझ्याविना’ मोठी भेट
आणखी कोणती असू शकते का’ ।। ७ ।।
कृष्ण प्रसन्नतेने हसला आणि म्हणाला ।
‘तुझ्याजवळ ‘तुझ्याविना’ काहीच नाही द्यायला मला,
तसेच मी ‘माझ्याविना’ काय देऊ तुला’ ।। ८ ।।
असे मनीचे जाणणारा भगवंताविना का कुणी असू शकतो ।
म्हणूनच देवा, आता जगाचा निरोप घ्यावासा वाटतो ।। ९ ।।
– कृष्णपुष्प (पुष्पांजली) (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७५ वर्षे), बेळगाव (२२.६.२०२२)