असंरक्षित गड-दुर्गांची जिल्हानिहाय माहिती गोळा करण्यात येणार !

राज्यशासनाच्या गड-दुर्ग संवर्धन समिती इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे आणि आमदार संजय केळकर यांचा समावेश !

मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यातील गड-दुर्ग यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यशासनाकडून स्थापन करण्यात आलेल्या गड संवर्धन समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. इतिहासतज्ञ श्री. पांडुरंग बलकवडे आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केळकर यांचा राज्यस्तरीय समितीमध्ये समावेश केला आहे.

गड-दुर्गांचे जतन आणि संवर्धन यांसाठी राज्यस्तरीय समितीमध्ये १४ जणांचा समावेश केला आहे, तसेच कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, संभाजीनगर अन् नांदेड या विभागानुसार २२ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यस्तरीय समिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून त्यामध्ये प्र.के. घाणेकर, ऋषिकेश यादव, डॉ. पुष्कर सोहोनी, डॉ. सचिन जोशी, अतुल गुरु, गिरीश टकले, संकेत कुलकर्णी, मुकुंद गोरक्षकर या शासनबाह्य सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

गड-दुर्गांची माहिती देण्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देणार !

गड-दुर्गांची माहिती देण्यासाठी विभागस्तरीय समितीच्या सहकार्याने स्थानिक युवक-युवती यांना मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, शाळा-महाविद्यालये यांच्याकडून गड-दुर्गांची नियमित स्वच्छता करण्याचा आराखडाही विभागीय समितीकडून सिद्ध करण्यात येणार आहे. राज्यातील गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी कोणकोणते उपक्रम राबवता येतील, याविषयी राज्यशासनाकडून अभ्यास करण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या वैभव स्मारक संगोपन योजनेच्या अंतर्गत गड-दुर्ग दत्तक घेण्यासाठी खासगी उद्योजक आणि व्यावसायिक यांना उद्युक्त करण्यात येणार आहे.

Download