लोकांना धर्माचरण करण्यासाठी प्रवृत्त करणारे आणि पत्नीला साधनेसाठी प्रोत्साहन देणारे नागपूर येथील श्री. शरद किटकरू (वय ७० वर्षे) !

नागपूर येथील श्री. शरद प्रभाकर किटकरू (वय ७० वर्षे) हे ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे कार्य करतात. ते नागपूर येथील सनातनच्या साधिका सौ. उषा किटकरू यांचे यजमान असून त्यांचा राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभाग असतो. त्यांचे कुटुंबीय आणि साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. शरद किटकरू

१. सौ. उषा शरद किटकरू (पत्नी)

१ अ. इतरांना निरपेक्षपणे साहाय्य करणे : ‘माझे यजमान कुणाच्याही अडचणी सोडवण्यासाठी त्यांना निरपेक्षपणे सर्व प्रकारचे साहाय्य करतात. ‘वनवासी कल्याण आश्रमा’त रहाणार्‍या आदिवासी मुलांनाही त्यांचा पुष्कळ आधार वाटतो. वेळप्रसंगी ते त्यांना आर्थिक साहाय्यही करतात.’

२. सौ. गौरी विद्याधर जोशी (थोरली मुलगी), नागपूर; सौ. दीप्ती ओंकार जरीपटके (मधली मुलगी), पुणे आणि सौ. प्राची निषाद जोशी (धाकटी मुलगी), सोलापूर

२ अ. परिस्थिती स्वीकारणे : ‘माझ्या आईच्या दीर्घ आजारपणात त्यांनी न कंटाळता आणि न चिडता आईची सेवा केली. ते कुटुंबियांना कोणतीही परिस्थिती आनंदाने स्वीकारायला सांगतात. आईच्या आजारपणात आणि अनेक कठीण प्रसंगांत ते धिराने परिस्थितीला सामोरे गेले.

२ आ. इतरांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त करणे : बाबा आमच्या नातेवाइकांना धर्माचरण करण्यास सांगतात, उदा. कुणी वाढदिवसाच्या दिवशी ‘केक’ कापला, तर ते त्याला विरोध करतात. ‘मुलींच्या कपाळावर कुंकू हवेच’, असा त्यांचा आग्रह असतो. पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे वापरण्यासही त्यांचा विरोध असतो. त्यांनी आम्हाला कधीही पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे वापरू दिले नाहीत.

२ इ. प.पू. निकालस महाराज आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावर श्रद्धा असणे : बाबांना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याविषयी काहीच ठाऊक नव्हते. एकदा बाबांना स्वप्नात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दिसले. काही दिवसांनी मी त्यांना महाराजांचे छायाचित्र दाखवले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘हेच महाराज माझ्या स्वप्नात आले होते.’’ तेव्हापासून त्यांची महाराजांवर भक्ती जडली.

चंद्रपूर येथील प.पू. निकालस महाराज आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. रात्री कितीही विलंब झाला, तरी ते रामनामाचा जप केल्याविना झोपत नाहीत.

२ ई. आईला सेवेत साहाय्य करणे : बाबा आईला सेवेत साहाय्य करतात, उदा. तिला सेवेच्या ठिकाणी नेऊन सोडणे इत्यादी. ते हिंदु राष्ट्र-जागृती सभांच्या वेळी अर्पण देतात.’

३. सौ. गौरी विद्याधर जोशी (थोरली मुलगी), नागपूर

३ अ. वाचनाची आवड : ‘बाबांना विविध विषयांवरील पुस्तके वाचण्याचा छंद आहे. पुस्तक वाचतांना दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम मोठ्या आवाजात चालू असेल किंवा लहान मुले गोंगाट करत असतील, तरी त्यांची एकाग्रता भंग पावत नाही.’

४. सौ. प्राची निषाद जोशी (धाकटी मुलगी), सोलापूर

४ अ. त्यागी वृत्ती : ‘माझ्या वडिलांनी भारतीय स्टेट बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम वनवासी कल्याण आश्रमा’ला काही रक्कम देणगीच्या स्वरूपात दिली.’

५. सौ. नम्रता विनय शास्त्री (साधिका), नागपूर

५ अ. स्वतःच्या घरी साधकांच्या निवासाची सोय करणे : ‘काका त्यांच्याकडे निवासाला आलेल्यांची प्रेमाने विचारपूस करतात. घरी साधक निवासाला असतांना ते सकाळी उठल्यावर म्हणायचे, ‘‘अंथरूण नंतर काढा. आधी गरम गरम चहा घ्या.’’ एकदा किटकरूकाकू बाहेरगावी गेल्या होत्या, तरीही काकांनी त्यांच्या घरी सेवेसाठी आलेल्या साधकांच्या निवासाचे नियोजन केले होते.

५ आ. पत्नीला सेवेसाठी प्रोत्साहन देणे

१. कधी कधी किटकरूकाकू साधकांना साहाय्य करण्यासाठी ८ – १० दिवस व्यस्त असतात; पण काकांनी त्याविषयी कधीही गार्‍हाणे केले नाही.

२. मध्यंतरी काकू २ – ३ वर्षे रुग्णाईत होत्या. आपल्याकडून सेवा होत नाही; म्हणून काकूंना वाईट वाटायचे. काकूंची सेवेची तळमळ पाहून काकांनी सनातनची सात्त्विक उत्पादने घरी मागवून घेतली आणि काकूंना सेवेसाठी प्रोत्साहित केले.

५ इ. अनुभूती : एकदा घरातील सर्वांच्या समवेत ते देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. तेव्हा ‘तेथे नामजप चांगला झाला आणि शांतीची अनुभूती आली’, असे त्यांनी सांगितले.

‘हे श्रीकृष्णा, ‘श्री. किटकरूकाका यांच्यामधील साधेपणा, प्रेमभाव, स्थिरता आणि शांत वृत्ती हे गुण आम्हा सर्व साधकांच्या अंगी येऊ दे’, ही भावपूर्ण प्रार्थना !’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १२.१०.२०२१)