सत्सेवेची तळमळ असणारे आणि कुटुंबियांना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. जयंत जठार (वय ५६ वर्षे) !

पू. (कु.) दीपाली मतकर

१. सत्सेवेची तळमळ

अ. ‘काकांचे पूर्ण कुटुंबच साधनेत आहे. कधी प्रतिकूल परिस्थिती असली, तरी काका ईश्वरप्राप्तीसाठी साधना करायलाच प्राधान्य देतात. रात्रपाळीनंतरही ते घरची कामे करून संगणकीय सेवाही थोडा वेळ करतात.

श्री. जयंत जठार

आ. काही दिवसांपासून काकांच्या छातीत दुखत होते, तरी त्याविषयी त्यांनी काकूंना काही सांगितले नाही आणि काकूंना सत्सेवेला पाठवले. नंतर काकांचा त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी २ दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते लगेच सत्सेवा करू लागले.

२. मुलीला साधनेसाठी साहाय्य करणे

काकांनी त्यांची मुलगी कु. पूजा (आताच्या सौ. पूजा गरुड) हिला देवद आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी पाठवले आहे. तिने साधनाच करावी, यासाठी ते तिला साहाय्य करतात. मुलीला आश्रमात पाठवले; म्हणून नातेवाईक काकांवर टीका करतात, तरी ते ‘साधनाच महत्त्वाची आहे’, असे सांगून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.

३. पत्नीकडून अधिकाधिक सत्सेवा होण्यासाठी सतत प्रयत्नरत असणे

अ. काकांचा मुलगा नोकरीनिमित्त अन्य गावात रहातो आणि काकांच्या पत्नी सौ. जठारकाकू सोलापूर जिल्ह्यात दायित्व घेऊन सेवा करतात. त्यामुळे काकू घरी अल्प दिवस आणि जिल्ह्यात सेवेसाठी अधिक दिवस असतात. तेव्हा स्थानिक साधक काकांना जेवणाचा डबा पाठवतात. काका जेवणाविषयी कधीच तक्रार करत नाहीत किंवा ‘काकूंनी घरात रहायला पाहिजे’, अशी अपेक्षाही करत नाहीत.

आ. सौ. जठारकाकूंना अधिक सेवा करता यावी, यासाठी काका ‘घरात साहित्य आणणे, स्वच्छता करणे, सुनेला बरे वाटत नसल्यास तिला डॉक्टरांकडे नेणे’ इत्यादी कामे करतात. त्यामुळे काकूंना घरात अधिक लक्ष द्यावे लागत नाही.

इ. जवळच्या नातेवाइकांकडे लग्न किंवा काही कार्य असेल, तर काका सौ. जठारकाकूंना त्या कार्याला येण्यासाठी कधीच आग्रह करत नाहीत. त्यामागे ‘काकूंचा सेवेतील वेळ त्यात खर्च व्हायला नको’, हा हेतू असतो.

४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

काका व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित करतात. त्यांना कामावरून येण्यास कितीही उशीर झाला, तरी ते आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठीची देवतांची चित्रे पालटणे, नामजप पूर्ण करणे आणि स्वतःवरील काळ्या (त्रासदायक) शक्तीचे आवरण काढणे, हे उपाय नियमित करतात.

५. आदर्श कुटुंब

काकांचे पूर्ण कुटुंबच आदर्श आणि सात्त्विक आहे. सर्व जण हसून खेळून रहातात. कुणाचीच कुणाकडून अपेक्षा नसते. ते सर्व जण एकमेकांना साहाय्य करतात आणि समजून घेतात.’

– कु. दीपाली मतकर (आताच्या पू. दीपाली मतकर), सोलापूर (१.८.२०१९)