नवी देहली – राजधानी देहलीतील हिंदु पुजार्यांची दयनीय स्थिती दर्शवणारा ‘इक्वल राईट्स फॉर हिंदूज’ (‘इ.आर्.एफ्.एच्.’) निर्मित माहितीपट येथील एका कार्यक्रमात नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या माहितीपटात हिंदु पुजार्यांना सामोरे जावे लागत असलेले खटले आणि संकटे यांचे चित्रण करण्यात आले आहे. कोविड महामारीच्या काळात मंदिरे बंद असतांना आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असतांना पुजारींवरील संकटे आणखीनच तीव्र झाल्याचे यामध्ये दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात हिंदु पुजारींकडे हिंदु समाज आणि सरकार यांचे होत असलेल्या दुर्लक्षावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. ज्याप्रकारे मुसलमान इमामांना दिले जाते, त्याप्रकारे हिंदु पुजारी आणि पुरोहित यांना २५ सहस्र रुपये मासिक मानधन देण्याची विनंतीही या माहितीपटाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे.
सौजन्य हम सब का मंच
या माहितीपटाच्या विशेष प्रसारणानंतर ‘इ.आर्.एफ्.एच्.’चे संस्थापक आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे माजी अतिरिक्त संचालक एम्. नागेश्वर राव यांनी हिंदूंसाठीची समान हक्क चळवळीविषयीची संकल्पना विशद केली. या वेळी राज्यघटनेच्या २५ ते ३० कलमांच्या अंतर्गत हिंदूंना समान अधिकार कसे नाकारले गेले आहेत, याविषयीही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, प्रख्यात विद्वान आणि भाषातज्ञ प्रा. कपिल कपूर यांनी त्यांच्या भाषणात इस्लामी आक्रमकांकडून भारतात हैदोस घातला जात असतांना हिंदु धर्मगुरु अन् पुरोहित यांनी हिंदु धर्म आणि संस्कृती कशा प्रकारे जपली, हे सांगितले.
संपादकीय भूमिकाबहुसंख्यांक हिंदूंच्या देशात त्यांच्याच पुजार्यांवर अशी स्थिती ओढावणे आणि त्यातही त्यावर प्रकाश टाकण्यासाठी माहितीपट काढावा लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! |