(म्हणे) ‘आमच्या राष्ट्रपती कशा दिसतात ?’

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारचे मंत्री अखिल गिरी यांचे राष्ट्रपतींविषयी अश्‍लाघ्य विधान

डावीकडून मंत्री अखिल गिरी आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कोलकाता (बंगाल) – बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री अखिल गिरी यांनी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविषयी बोलतांना ‘आम्ही कुणालाही त्याच्या दिसण्यावरून ओळखत नाही. आम्ही भारताच्या राष्ट्रपतीपदाचा आदर करतो; पण आमच्या राष्ट्रपती कशा दिसतात ?’, असे अशलाघ्य विधान केले. ते नंदीग्राम येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यासह गिरी यांनी बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्यावर टीका करतांना म्हटले, ‘मी सुंदर नाही; मग ते, म्हणजे सुवेन्दू अधिकारी किती सुंदर आणि देखणे आहेत ?’ गिरी यांच्या विधानांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.

अखिल गिरी यांच्या विधानावरून भाजपने आरोप केला आहे की, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील असून त्यांच्या दिसण्यावरून वक्तव्य करणारे मंत्री, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा पक्ष हा आदिवासीविरोधी आहे.

(म्हणे) ‘जर राष्ट्रपतींना त्यांचा अवमान झाला आहे, असे वाटत असेल, तर मला खेद आहे !’

अखिल गिरी यांचे क्षमायाचना करण्याचे ढोंग

अशा प्रकारची क्षमायाचना करणे, ही शुद्ध धूळफेक आहे. या विधानासाठी गिरी यांच्याविरुद्ध  गुन्हा नोंदवून त्यांना अटक करून कारागृहातच डांबण्याची आवश्यकता आहे, असेच यातून लक्षात येते !

गिरी यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी क्षमा मागितली आहे. ते म्हणाले की, मी कुणाचेही नाव घेतलेले नाही. जर भारताच्या राष्ट्रपतींना त्यांचा अपमान झाला, असे वाटत असेल, तर मला खेद आहे. माझ्या वक्तव्याविषयी मी खेद व्यक्त करतो. मी राष्ट्रपतींचा मान राखतो. मी सुवेंदु अधिकारी यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तुलना केली होती. सुवेंदु माझा अवमान करत होते, तसेच ते मला शिवीगाळ करत होते. मीही मंत्री आहे. माझ्यावर ते अशा प्रकारे विधाने करू शकत नाहीत. ते राज्यघटनेचा अवमान करत आहेत. मी त्यांच्याविषयी रागात होतो आणि त्यातून मी राष्ट्रपतींविषयी विधान केले.

संपादकीय भूमिका 

कुणाच्या दिसण्यावरून, तसेच त्यांच्या शारीरिक व्यंगावरून अशा प्रकारचे विधान करणे पाप आहे. मंत्रीपदावर असणारी व्यक्ती देशाच्या राष्ट्रपतींविषयी असे विधान करते, यावरून त्यांची पात्रता काय आहे, हे स्पष्ट होते. अशा मंत्र्यांवर एक महिला म्हणून तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कारवाई करणे अपेक्षित आहे !