केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्‍या पाळीव प्राण्‍याप्रमाणे वागत आहेत ! – उद्धव ठाकरे 

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे

मुंबई – संजय राऊत यांच्‍या जामिनाच्‍या वेळी न्‍यायालयाने अत्‍यंत परखडपणे आणि स्‍पष्‍टपणे काही निरीक्षणे नोंदवली आहेत. त्‍यामुळे केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्‍या पाळीव प्राण्‍याप्रमाणे वागत आहेत, हे जगजाहीर झाले आहे, असे वक्‍तव्‍य शिवसेनेच्‍या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. १० नोव्‍हेंबर या दिवशी संजय राऊत यांच्‍या सुटकेनंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका पत्रकार परिषद घेऊन स्‍पष्‍ट केली. या वेळी खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्‍य ठाकरे हेही उपस्‍थित होते.

उद्धव ठाकरे पुढे म्‍हणाले, ‘‘केंद्र सरकार न्‍यायदेवतेलाही स्‍वत:च्‍या नियंत्रणात आणण्‍याचा प्रयत्न करत आहे. न्‍यायालयाच्‍या चपराकीची लाज वाटण्‍याइतके केंद्र सरकार संवेदनशील असते, तर अशा घटना घडल्‍या नसत्‍या.’’


राजकीय कटुता ही महाराष्‍ट्राची संस्‍कृती नाही ! – संजय राऊत 

शिवसेनेसाठी मी १० वेळाही कारागृहात जाईन. पक्षासाठी कधीतरी त्‍याग करावा लागतो. पक्षाने मला जे दिले, त्‍याविषयी कृतज्ञता व्‍यक्‍त करायला हवी. राजकीय कटुता संपली पाहिजे. राजकीय कटुता बाळगणे, ही महाराष्‍ट्राची संस्‍कृती नाही. राज्‍याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेणार आहे. कारागृहातील अनुभवलेल्‍या अडचणी त्‍यांना सांगणार आहे.

कटुता दूर करायची असेल, तर सर्वांनी मिळून ठरवावे लागेल ! – देवेंद्र फडणवीस

याविषयी पत्रकारांच्‍या प्रश्‍नावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, ‘‘संजय राऊत मला भेटणार असतील, तर मी भेटायला सिद्ध आहे. राजकारणातील कटुता दूर करायची असेल, तर सर्वांना मिळून ठरवावे लागेल. कुठलाही एक पक्ष भूमिका घेऊ शकत नाही. नेत्‍यांनी शांत रहायचे आणि अन्‍यांना बोलायला लावायचे, ही पद्धत बंद करावी लागेल.’’