मनोरंजन वाहिन्यांना प्रतिदिन देशहिताच्या कार्यक्रमासाठी ३० मिनिटे द्यावे लागणार !

केंद्रशासनाचे मनोरंजन वाहिन्यांसाठी नवीन नियम

नवी देहली – केंद्रशासनाने खासगी मनोरंजन वाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे घोषित केली आहेत. यात ‘देशहिताच्या संदर्भात प्रतिदिन ३० मिनिटांचे कार्यक्रम प्रदर्शित करण्यात यावेत’ असे म्हटले आहे. याआधी मार्गदर्शक तत्त्वे वर्ष २००५ मध्ये प्रसारित करण्यात आली होती, तर वर्ष २०११ मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली होती. अंतरिम कालावधीतील तांत्रिक प्रगती लक्षात घेतल्यानंतर आता ११ वर्षांनंतर सध्याची सुधारणा करण्यात आली आहे.

१. वाहिन्यांना शिक्षण आणि साक्षरतेचा प्रसार, कृषी अन् ग्रामीण विकास, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विज्ञान अन् तंत्रज्ञान, महिलांचे कल्याण, दुर्बल घटकांचे कल्याण, पर्यावरणाचे संरक्षण, तसेच सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रीय एकात्मता, यांसारख्या राष्ट्रीय हिताच्या विषयांवर प्रतिदिन ३० मिनिटांचे जनहिताचे कार्यक्रम प्रसारित करावे लागतील.

२. वाहिन्यांना सार्वजनिक हिताच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रसारित करण्यासाठी सरकारकडून कोणतेही कार्यक्रम देण्यात येणार नाहीत. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या आशयांवर वाहिन्यांना स्वतःचे कार्यक्रम सिद्ध करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.