महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्या निरीक्षणानुसार मेट्रोमुळेच वाहतूक कोंडी !

पुणे – मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी लावलेल्या लोखंडी जाळ्यांमुळे वाहतुकीचा वेग संथ होऊन वाहतूक कोंडी होत आहे. काम चालू नसतांना आणि आवश्यकता नसतांनाही मेट्रोने ठिकठिकाणी लोखंडी जाळ्या लावल्यामुळे मेट्रोवर कारवाई का करू नये ? असा खुलासा मागवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांच्या संयुक्त पहाणी दौर्‍यात घेण्यात आला. शहरात अनेक ठिकाणी महामेट्रो आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या वतीने मेट्रो प्रकल्पाची कामे चालू आहेत, तर काही ठिकाणी उड्डाणपूल आणि अन्य विकासकामे चालू आहेत. त्यामुळे लोकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पोलीस आणि महापालिका अधिकारी यांचा संयुक्त पहाणी दौरा आयोजित केला होता. त्या अन्वये शहराच्या विविध भागांतील कामांची पहाणी पोलीस आयुक्त अभिनव गुप्ता आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केली. या वेळी संबंधित यंत्रणांना पोलिसांनी आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांनी काही सूचनाही दिल्या. या सूचनांमुळे शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल असा दावा पोलीस आणि महापालिका प्रशासनाने केला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, तशा सूचना महापालिकेने पोलिसांना दिल्या आहेत.