श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पानीपत (हरियाणा) येथे श्रद्धांजली वहाण्यासाठी मोहीम ! – नितीन चौगुले

श्री. नितीन चौगुले

सांगली – १४ जानेवारी २०२३ ला श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने पानीपत (हरियाणा) येथे श्रद्धांजली वहाण्यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. १४ जानेवारी १७६१ ला पानिपतचे युद्ध झाले. त्यामुळे त्या मुहूर्तावरच या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मोहिमेत महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक श्री. नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केले.

१. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते वाढवले. त्यापुढील काळात इस्लामिक आक्रमणे थांबवण्याचे काम मराठ्यांनी केले. त्यामुळे मराठा समाजाने घडवलेल्या इतिहासाची जाणीव होण्यासाठी ८ दिवसांच्या या मोहिमेचे आयोजन केले आहे. पराक्रमी झाशीची राणीचा इतिहास, लाल किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना झालेली अटक, आग्रा, गोवा अशा ठिकाणी ही मोहीम राबवण्यात येणार आहे.

२. प्रत्येक वर्षी पंढरपूर येथे वारकरी चालत जातात आणि त्यात वाहनांचे अपघात होऊन वारकरी जागीच मृत्यूमुखी पडतात. तरी त्यासाठी महामार्ग चालू होताच वारकर्‍यांना चालण्यासाठी एक स्वतंत्र रस्ता बनवावा, तसेच प्रत्येक २५ किलोमीटर वारकर्‍यांसाठी थांबा बनवावा, अशी मागणी प्रतिष्ठानच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

३. सध्या ‘शेअर मार्केट’मध्ये १९ खोट्या आस्थापनांविषयी घोटाळे लक्षात आले आहेत. याची माहिती प्रामुख्याने मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच इतरांना दिली आहे. काही तक्रारदारांना समवेत घेऊन या विषयी तक्रार प्रविष्ट केली आहे.