शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम् सुफलाम् कर !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री विठ्ठलचरणी साकडे

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

शासकीय पूजेला उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सौ. अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी

पंढरपूर, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – गोरगरीब जनता, कष्टकरी आणि शेतकरी यांच्यावर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम् सुफलाम् व्हावा, यासाठी शक्ती आणि आशीर्वाद द्यावा, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेच्या प्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. श्री विठ्ठल-रुक्मिणी यांची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ. अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडली.

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘अनेक आक्रमणे होत असतांनाही वारकर्‍यांनी भागवत धर्माची पताका फडकवत ठेवली. वारीचा हा अभूतपूर्व सोहळा पहाणार्‍याच्या डोळ्यांचे पारणे फिटते. पंढरपूर वारीच्या सर्व परंपरा अखंडित ठेऊन, स्थानिकांना विश्‍वासात घेऊन, तसेच कुणाचीही हानी न करता पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम करण्यात येईल.’’ नामदेव पायरी ही एक अभूतपूर्व व्यवस्था आहे. या पायरीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. त्यामुळे मंदिर जीर्णोद्धार आणि नामदेव पायरीचा विकास प्राधान्याने करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

उपस्थितांशी संवाद साधतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्री संत नामदेव महाराज वाड्याला भेट आणि दर्शन

श्री संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ. अमृता फडणवीस यांनी श्री संत नामदेव महाराज वाड्यात जाऊन दर्शन घेतले. मंदिर समितीच्या वतीने त्यांचा पगडी आणि शाल देऊन, तर सौ. अमृता फडणवीस यांचा साडी देऊन सत्कार करण्यात आला.