पंतप्रधान मोदी यांची मोरबी (गुजरात) येथे अपघातग्रस्त भागाला भेट

अपघातग्रस्त लोकांची विचारपूस करताना पंतप्रधान मोदी

मोरबी (गुजरात) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यासह त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन घायाळ झालेल्या लोकांची विचारपूस केली. मोरबी येथील मच्छु नदीवरील ३० ऑक्टोबरला झालेल्या पूल दुर्घटनेतील १३४ मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. हा मृतांचा अधिकृत आकडा आहे. दुर्घटनेच्या तिसर्‍या दिवशी, म्हणजे १ नोव्हेंबरला नौदल आणि ‘एन.डी.आर्.एफ्.’च्या पथकांनी पुन्हा एकदा मच्छु नदीतील मृतदेहांचा शोध चालू केला आहे.

गुजरातमध्ये बुधवारी एक दिवसाचा शासकीय दुखवटा घोषित

गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी संध्याकाळी गांधीनगरमध्ये उच्चस्तरीय बैठक घेतली. पंतप्रधान म्हणाले की, पीडितांना शक्य ते सर्व साहाय्य करण्यात यावे. या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त करण्यासाठी २ नोव्हेंबर या दिवशी गुजरातमध्ये राजकीय शोक पाळण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या दिवशी राज्यातील सरकारी इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. या बैठकीत मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी यांच्यासह मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पूल दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. यावर १४ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणी आतापर्यंत पुुलाची देखभाल करणार्‍या ओरेवा आस्थापनाचे २ व्यवस्थापक, पुलाची दुरुस्ती करणारे २ कंत्राटदार, २ तिकीट कारकून आणि ३ सुरक्षा रक्षक यांना अटक करण्यात आली आहे.