‘रामनाथी आश्रम साक्षात् वैकुंठच आहे’, असा भाव असणार्‍या पुणे येथील युवा साधिका !

कु. आकांक्षा घाडगे

१. युवा शिबिरासाठी आलेल्या एका साधिकेने रामनाथी आश्रमाजवळील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला फुले वहाणे, तिने भूमीला डोके टेकवून नमस्कार केल्यावर तिची भावजागृती होणे आणि तिच्या समवेत असलेल्या साधिकांनीही नमस्कार करणे अन् हे दृश्य पाहून त्या साधिकांना मानस नमस्कार करणे

‘२७.१०.२०२२ या दिवशी मी सकाळी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभी होते. त्या वेळी पुण्याहून चार साधिका युवा शिबिरासाठी आल्या होत्या. त्यांच्यापैकी एक साधिका कु. आकांक्षा घाडगे (वय २२ वर्षे) स्वतःच्या समवेत काही फुले घेऊन आली होती. आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येण्यापूर्वी तिने प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला काही फुले वाहिली आणि खाली बसून भूमीला डोके टेकवून आश्रमाला नमस्कार केला. त्या क्षणी तिच्या नेत्रांमधून भावाश्रू वाहू लागले. तिच्यासह आलेल्या अन्य तीन साधिकांनीही त्या वेळी हात जोडून आश्रमाला नमस्कार केला. हे भावपूर्ण दृश्य पाहून माझीही भावजागृती झाली. मला त्या चार साधिकांप्रती पुष्कळ प्रेम वाटू लागले आणि मी त्या चौघींना मानस नमस्कार केला.

कु. संगीता मेनराय

२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कृपाशीर्वाद आणि संकल्प यांमुळेच येणार्‍या हिंदु राष्ट्रासाठी सात्त्विक पिढी निर्माण होऊन तिच्यात भक्तीभाव फुलत आहे’, असे प्रकर्षाने जाणवणे

त्या वेळी मी मनात गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ कृतज्ञता व्यक्त केली. केवळ त्यांचे कृपाशीर्वाद आणि संकल्प यांमुळेच येणार्‍या हिंदु राष्ट्रासाठी अशी सात्त्विक पिढी निर्माण होत आहे आणि ‘एवढ्या लहान वयातच त्यांच्यामध्ये भक्तीभाव फुलत आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवले.

३. ‘रामनाथी आश्रम वैकुंठच असून इथे येण्याचे भाग्य ईश्वराच्या कृपेनेच लाभले आहे आणि घरून येतांनाच श्री चरणी अर्पण करण्यासाठी फुले घेऊन आले’, असे साधिकेने सांगणे

मी आकांक्षाला भेटून विचारले, ‘‘आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुले अर्पण करतांना तुमचा भाव काय होता ?’’ तेव्हा तिने सांगितले, ‘‘आम्ही प्रथमच सनातनच्या रामनाथी आश्रमात आलो आहोत. हा आश्रम म्हणजे साक्षात् वैकुंठच आहे. येथे येण्याची संधी सर्वांना लाभत नाही. ईश्वराच्या कृपेमुळेच आम्हाला ते भाग्य लाभले आहे. त्यामुळे मी पुण्याहून येतांनाच श्री चरणी अर्पण करण्यासाठी फुले घेऊन आले होते.’’

हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव, ‘आपल्या कृपेमुळेच आज मला कृतज्ञताभाव कसा असायला हवा ?’, हे शिकायला मिळाले. त्यासाठी मी आपल्या कोमल श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. संगीता मेनराय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२७.१०.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक