सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धेने आणि समर्पणभावाने सेवा करणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील आदर्श वास्तूविशारद (सौ.) शौर्या सुनील मेहता (वय ४६ वर्षे) !

सौ. शौर्या मेहता

६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील वास्तूविशारद (सौ.) शौर्या मेहता यांचा ३०.१०.२०२२ या दिवशी ४६ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या कु. कौमुदी जेवळीकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१. प्रेमभाव

अ. ‘सौ. शौर्याताईंच्या मनात साधकांबद्दल निरपेक्ष प्रेम आहे. त्यांच्या मनात सतत साधकांचा विचार असतो. कधी त्यांनी घरी एखादा नवीन पदार्थ केला, तर त्या तो साधकांसाठी घेऊन येतात.

आ. एकदा बांधकाम सेवेतील एका साधकाचा वाढदिवस होता. त्याविषयी शौर्याताईंनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगितले. तेव्हा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी त्या साधकाला वाढदिवसानिमित्त खाऊ दिला. यात ‘त्या साधकाला वाढदिवसानिमित्त सद्गुरु ताईंचा आशीर्वाद मिळावा आणि तो साधनेत लवकर पुढे जावा’, असा शौर्याताईंचा भाव होता.

कु. कौमुदी जेवळीकर

२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ नेहमी म्हणतात, ‘सौ. शौर्याताईंचे मन पुष्कळ निर्मळ आहे.’

३. सेवेची तळमळ

अ. सौ. शौर्याताई अखंड सेवारत असतात. त्या तळमळीने सेवा करतात. सेवा करतांना त्यांना कितीही कष्ट घ्यावे लागले, तरीही त्या ते घेतात आणि सेवा परिपूर्ण करतात.

आ. सौ. शौर्याताईंची आई आजारी असतांना त्यांना आईच्या सेवेसाठी रात्री उठावे लागायचे. प्रति दोन घंट्यांचा गजर लावून त्या आईला प्रसाधनगृहात घेऊन जायच्या आणि परत झोपायच्या. अशा स्थितीत त्यांची झोप पूर्ण व्हायची नाही, तरीही त्या उत्साहाने सेवा करायच्या.

इ. सौ. ताईंच्या आईला वरचेवर रुग्णालयातही न्यावे लागायचे, तरीही त्या रुग्णालयातून घरी जाऊन घरचे सगळे आवरून आश्रमात सेवेला यायच्या.

४. चिकाटी आणि संयम

सौ. शौर्याताई वास्तूविषयीचा एक आराखडा अनेक दिवस करत होत्या; पण तो अंतिम होत नव्हता. त्यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. अनेक पर्याय (option) शोधले ; पण तो पूर्ण होत नव्हता, तरीही त्यांनी ती सेवा सोडली नाही. आराखडा अंतिम झाला; परंतु त्यावर समाधानी न रहाता ‘मी अजून चांगले काय करू शकते ?’, असा विचार त्या करायच्या. त्यांच्यात पुष्कळ चिकाटी आणि संयम आहे.

५. सहसाधकांना आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन साहाय्य करणे

५ अ. चुकांविषयी अंतर्मुखता वाढवणे : काही दिवसांपूर्वी एका साधिकेने माझी एक चूक शौैर्याताईंना सांगितली. त्या वेळी त्या साधिकेविषयी आणि त्या प्रसंगाविषयी माझ्या मनात बहिर्मुखतेची विचारप्रक्रिया चालू झाली. त्याविषयी मी शौैर्याताईंना सांगितले असता त्यांनी मला सांगितले, ‘‘स्वाती नक्षत्रातील पावसाच्या पाण्याचा थेंब शिंपल्यात पडला, तर त्याचा मोती होतो; पण तोच थेंब सापाच्या तोंडात पडला, तर त्याचे विष होते. तू विचार कर, ‘तुला मोती व्हायचे आहे कि विष ?’ या प्रसंगाकडे तू सकारात्मक दृष्टीने पाहून त्या साधिकेने तुला लक्षात आणून दिलेले तुझे दोष घालवण्याचा प्रयत्न केलास, तर तुझ्यात अंतर्मुखता निर्माण होऊन साधनेच्या दृष्टीने याचा तुला लाभ होऊ शकतो. तू या प्रसंगाकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलेस, तर तुझ्या मनात त्या साधिकेविषयी पूर्वग्रह निर्माण होऊन तुझ्या साधनेची हानी होऊ शकते.’’ तार्ईंच्या या दृष्टीकोनामुळे माझे मन अंतर्मुख झाले.

५ आ. साधिकेविषयी पूर्वग्रह न बाळगता सतत साहाय्य करणे : मला होणारे आध्यात्मिक त्रास आणि माझे स्वभावदोष अन् अहं यांमुळे अनेकदा मी तार्ईंना ‘मला सेवाच करायची नाही’, असे सांगते आणि सेवा करत नाही; पण त्यांनी कधीही माझ्याविषयी पूर्वग्रह करून घेतला नाही. त्यांच्या मनात माझ्याविषयी एकदाही नकारात्मक विचार आला नाही. त्या प्रत्येक वेळी नवा दृष्टीकोन देऊन मला सेवेत सामावून घेतात. त्यांच्यामुळेच मी थोडीतरी सेवा करू शकते.

६. सूक्ष्मातील कळणे

६ अ. साधिकेच्या मनातील विचार न सांगताही कळणे : अनेकदा त्या आणि मी सेवेला एकत्र बसलो, बैठकीत एकत्र असलो किंवा अगदी येता-जाताही माझ्या मनातील विचार मी त्यांना सांगण्याआधीच त्या तो मला सांगतात. पूर्वी जेव्हा त्यांना माझ्या मनातील विचार कळायचे, तेव्हा मला वाटायचे की, त्यांचा माझ्या प्रकृतीचा अभ्यास झाल्यामुळे त्यांना हे कळते; पण आता माझे सेवेच्या संदर्भातील विचारही त्यांना न सांगता कळतात.

६ आ. आता सौ. शौर्याताईंना स्पंदनांवरून बरेच काही कळते, उदा. सेवा पूर्ण होईल का? इत्यादी.

७. चुका झाल्यास निराश न होता त्यांमधून शिकून पुढे जाणे

सौ. ताईंकडून कधी सेवेत चूक झाली, तर त्यांना त्याविषयी पुष्कळ खंत वाटते. त्या त्यावर योग्य प्रकिया करतात आणि पुनः ती चूक होऊ नये, यासाठी सतर्क असतात. चुकीतून जे शिकायला मिळाले, ते त्या कधीच विसरत नाहीत. मी त्यांच्या समवेत ५ वर्षांपासून सेवा करत आहे. अनेक सेवा आल्या. त्यात काही वेळा त्यांच्या चुकाही झाल्या; पण ‘चुकांनी त्या कधी खचल्या नाहीत आणि त्यांनी सेवाही थांबवली नाही. संतांनी जरी त्यांना चुका सांगितल्या, तरीही त्या प्रतिदिन त्याच ऊर्जेने सेवा करतात.

याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ एकदा म्हणाल्या, ‘‘शौर्या, तू चुका सांगितल्यावर निराश होऊन सेवा सोडत नाहीस. त्यामुळे तुला सहजपणे चुका सांगता येतात. काहींना चुका सांगितल्यावर निराशा येते.’’

८. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा असणार्‍या सौ. शौर्या मेहता !

८ अ. अशक्य वाटणारी सेवा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवरील श्रद्धेमुळे पूर्ण होणे : एकदा प.पू. डॉक्टरांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) त्यांना एक सेवा देऊन सांगितले, ‘‘ही सेवा करून मला उद्या दाखवायला आणा.’’ तेव्हा त्यांनी श्रद्धेने ती सेवा केली आणि दुसर्‍या दिवशी त्या प.पू. डॉक्टरांना दाखवायला गेल्या. त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती. प.पू. डॉक्टरांनी त्यांचे कौतुक करून त्यांना खाऊ दिला. बुद्धीने विचार केल्यास ती सेवा इतक्या अल्प वेळेत होणे शक्य नव्हते; पण गुरूंचा संकल्प आणि ताईंची श्रद्धा यांमुळे अशक्य गोष्टी साध्य होतात. असे ‘गुरु-शिष्य’ नाते आम्हाला अनुभवायला मिळत आहे, याबद्दल कृतज्ञता !

८ आ. सेवांचा ताण असतांना श्रद्धा ठेवून सेवा केल्यावर तीनही गुरूंचा सत्संग लाभणे : एकदा सौ. ताईंना सेवांचा पुष्कळ ताण होता आणि त्रासही होत होता. त्या प्रार्थना करत सेवा करत होत्या. तेव्हा ‘प.पू. डॉक्टर नक्कीच माझी प्रार्थना ऐकत आहेत’, अशी त्यांची श्रद्धा होती. त्यानंतर लगेचच त्यांना प.पू. डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या तिन्ही गुरूंचा सत्संग लाभला.

८ इ. त्यांच्या मनात प.पू. डॉक्टरांविषयी कृतज्ञता असते आणि ‘आपण गुरुसेवा झोकून देऊन केली, तर बाकी सर्वकाही गुरुच सांभाळतात’, अशी त्यांची ठाम श्रद्धा असते. आम्हालाही त्या हे वारंवार सांगत असतात.

९. बाहेरील वास्तुविशारदांनी केलेले शौर्याताईंचे कौतुक !

अ. एकदा एक वास्तूविशारद सौ. शौर्यातार्ईंचे कौतुक करत म्हणाले, ‘‘ताईंचे प.पू. डॉक्टरांप्रती असलेले समर्पण पुष्कळ आहे. आम्ही दोघे करत असलेल्या सेवेचे ९९ टक्के श्रेय त्यांचे (सौ. शौर्या यांचे) असेल आणि १ टक्के श्रेय माझे असेल. मी एवढे वास्तूविशारद पाहिले; पण त्यांच्या एवढे कष्ट घेणारे कुणीच पाहिले नाही.’’

आ. दुसरे एक वास्तूविशारद म्हणाले, ‘‘शौर्याताईंसारखे परिपूर्ण सेवा करणारे मी कुणीच पाहिले नाही.’

प.पू. डॉक्टर, तुम्ही आम्हाला ताईंचा सहवास दिलात, यासाठी कृतज्ञता ! ‘या क्षणापासून मला तिचे गुण आत्मसात करता यावेत’, अशी तुमच्या चरणी याचना आहे.’

– कु. कौमुदी जेवळीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.(१७.१०.२०२२)