आसाममध्ये ३ स्वीडिश नागरिकांना ख्रिस्ती प्रार्थनासभेतून घेण्यात आले कह्यात !

गौहत्ती (आसाम) – व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली २ महिलांसह ३ स्वीडिश नागरिकांना पोलिसांनी नुकतेच कह्यात घेतले. त्यांना अटक न करता लवकरच स्वीडनच्या दूतावासाकडे सोपवण्यात येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. नामरूपचे पोलीस उपअधीक्षक नाबा कुमार बोरा यांनी सांगितले की, दिब्रुगढ जिल्ह्यातील घिनई येथे एका ख्रिस्ती प्रार्थनासभेतून या तिन्ही पर्यटकांना कह्यात घेण्यात आले.

बोरा यांनी माहिती दिली की, आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याचा प्रयत्न चालू असतांना स्वीडनच्या भारतातील दूतावासाने भारतीय अधिकार्‍यांकडे त्यांना क्षमा करण्याची विनंती केली. आरोपींनीही प्रार्थनासभेला चुकून गेल्याचे सांगून क्षमायाचना केली. युनायटेड चर्च फोरमच्या वतीने तीन दिवसीय प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते.