अंदमानच्या माजी मुख्य सचिवांच्या निवासस्थानी २० महिलांना नेण्यात आल्याची माहिती

नोकरीच्या बदल्यात लैंगिक शोषणाचे प्रकरण

डावीकडे माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन

नवी देहली – अंदमान आणि निकोबारमध्ये लैंगिक शोषणाच्या बदल्यात काही महिलांना नोकरी देण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे. अंदमान आणि निकोबारचे माजी मुख्य सचिव जितेंद्र नरेन अन् कामगार आयुक्त आर्.एल्. ऋषी यांच्याविरोधात २१ वर्षीय महिलेने सामूहिक बलात्कार आणि लैंगिक अत्याचारांचे आरोप केले आहेत. या आरोपांची चौकशी करतांना पोलिसांना नोकरीच्या बदल्यात लैंगिक शोषणाची माहिती मिळाली. दुसरीकडे नरेन यांनी हे आरोप फेटाळले आहेत. माझ्याविरोधात कट रचला जात असल्याचा दावा त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात केला आहे.

१. नरेन यांच्या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांच्या पोर्ट ब्लेअर येथील निवासस्थानी २० महिलांना नेण्यात आले होते. या महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे तपासात पुढे आले आहे.

२. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष अन्वेषण पथकाकडून नरेन यांची २८ ऑक्टोबरला चौकशी करण्यात येणार आहे.

३. लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर नरेन यांना गृह मंत्रालयाकडून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात त्यांना न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.