सौ. अंजली बाळासाहेब विभूते यांच्याविषयी त्यांच्या मुलाला जाणवलेली सूत्रे

२६.१०.२०२२ (कार्तिक शुक्ल द्वितीया, भाऊबीज) या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनतच्या आश्रमातील सौ. अंजली बाळासाहेब विभूते यांचा ५९ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचा मुलगा श्री. अभिजीत विभूते यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

सौ. अंजली विभूते

सौ. अंजली बाळासाहेब विभूते यांना ५९ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची भेट झाल्यावर त्यांनी आईला नामजप करायला सांगणे आणि नामजप नित्यनेमाने केल्यामुळे तिला होणारे त्रास अल्प होणे

‘माझी आई लहानपणापासून व्रतवैकल्ये आणि कर्मकांड मनापासून करत असे. त्या पुण्याईमुळे तिला साधनेचे मार्गदर्शन करणारी सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गुरुरूपात प्राप्त झाले. वर्ष १९९७ मध्ये पोफळी (जिल्हा रत्नागिरी) येथे सार्वजनिक सभा आणि गुरुदेवांचे साधनेविषयी मार्गदर्शन होते. तिथे आईची गुरुदेवांशी भेट झाली. तेव्हा गुरुदेवांनी तिला प्रतिदिन ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ६ माळा करण्यास सांगितला. आई तो जप आजही नित्यनेमाने करते. त्यामुळे तिला होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास अल्प झाले आहेत.

श्री. बाळासाहेब विभूते

२. प्रेमभाव

आई गावाहून आश्रमात जातांना सर्व साधकांसाठी खाऊ घेऊन जाते. आईला इतरांना खाऊ वाटण्यात आनंद मिळतो.

३. आश्रमातील चैतन्यामुळे कविता सुचणे

आश्रमातील चैतन्यदायी वातावरणामुळे आईला राष्ट्र, धर्म आणि गुरुमाऊली यांच्यावर अनेक कविता उस्फूर्तपणे सुचल्या आहेत. तिची प्रतिभा जागृत झाली आहे.

श्री. अभिजीत विभूते

४. व्यष्टी साधनेची तळमळ

वर्ष २००२ पासून आईला संधीवाताचा तीव्र त्रास होत होता. तिच्या सांध्यांमध्ये पुष्कळ वेदना व्हायच्या, तरीदेखील ती सत्संगांना नियमित जात असे. ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी सारणीचे लिखाण नियमित करते.

५. मिळालेली सेवा आनंदाने करणे

प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांचे कार्यक्रम आणि भंडारे असायचे. तेव्हा ती त्यामध्ये सक्रीय सहभाग घेत असे. कार्यक्रमात येणार्‍या साधकांसाठी महाप्रसाद बनवण्याची सेवा ती आनंदाने करत असे.

५ अ. मिळालेली सेवा स्वीकारल्यावर आलेली अनुभूती : एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या सभेच्या कार्यक्रमात आईला १०० ते २०० पोळ्या करण्याची सेवा मिळाली. तेव्हा तिच्या मनात आरंभी ‘मी घरी आताच स्वयंपाक करून आले आहे आणि येथेही तेच करायचे आहे’, अशी प्रतिक्रिया आली. त्या वेळेस ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत असल्यामुळे तिला तिच्या चुकीच्या विचाराची जाणीव झाली आणि तिने ती सेवा स्वीकारली. त्यानंतर एका साधिकेकडून तिला निरोप आला, ‘तुम्ही केवळ प.पू. डॉक्टरांसाठी फुलके करा.’ तेव्हा तिच्या लक्षात आले, ‘मिळालेली सेवा आपण मनापासून स्वीकारल्यावर देव आपल्याला किती भरभरून देतो !’  अशा प्रकारे तिला देवाची लीला अनुभवायला मिळाली.

६. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांविषयीचा कृतज्ञताभाव

आईला २० वर्षे संधीवाताचा, तसेच मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होता. त्यावर तिला गुरुकृपेमुळेच मात करता आली. तिच्यावर सर्व प्रकारचे औषधोपचार आणि अनेक ज्योतिष्यांनी सांगितलेले विधी केले; परंतु त्यामुळे तिच्यात काही काळापुरता फरक पडायचा. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा ।’ या प.पू. भक्तराज महाराज यांच्या वचनाप्रमाणे तिने ते सर्व दुखणे २० वर्षे सोसले. त्यानंतर गुरुमाऊलींच्या कृपेमुळेच तिची त्रासांतून मुक्तता झाली. त्यासाठी ती गुरुदेवांविषयी नेहमी कृतज्ञता व्यक्त करते.

७. सनातनच्या संतांप्रतीचा भाव

आईला देवद आश्रमातील संत आणि साधक यांचा पुष्कळ आधार वाटतो. परात्पर गुरु पांडे महाराज, सद्गुरु राजेंद्र शिंदे, पू. अश्विनी पवार, पू. उमेश अण्णा या सर्व संतांच्या चरणी ती भावपूर्णरित्या कृतज्ञता व्यक्त करते. समाजातील लोक आणि नातेवाईक तिला विचारतात, ‘‘तू एवढ्या मोठ्या आजारातून कशी बरी झालीस ?’’ तेव्हा ती त्यांना सांगते, ‘‘माझ्या गुरुमाऊलींमुळे ! तुम्ही देवासाठी १ पाऊल पुढे गेलात, तर देव तुमच्यासाठी १० पावले पुढे येतो.’’

८. मुलांकडून साधना होण्यासाठी प्रयत्न करणे (आदर्श आई-वडील)

समाजातील आई-वडील मुलांना व्यवहारात उच्च पद गाठण्यासाठी मार्गदर्शन करतात. ते त्यांची नातवंडे, गाडी, बंगला इत्यादींनाच सर्वस्व मानतात; परंतु माझे आई-वडील मी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्यासाठी आणि गुरूंची सेवा करण्यासाठी मला आर्थिक, मानसिक आणि आध्यात्मिक आधार देतात. ते मला ‘तू पूर्णवेळ साधना करून स्वतःचा उद्धार करून घे आणि गुरुदेवांचे चरण सोडू नकोस’, असे सांगतात. जेव्हा माझी स्थिती नकारात्मक झाली होती, तेव्हा आई-बाबा यांनी मला सकारात्मक दृष्टीकोन देऊन गुरुमाऊली आणि आश्रम यांचे महत्त्व सांगितले. मी कधी चुकीचे वागलो, तर आई मला शिक्षा करते. आमचे नामजपादी उपाय, प्रार्थना, लिखाण या व्यष्टीच्या प्रयत्नांचा ती आढावा घेत असते, तसेच ती आम्हाला वास्तू आणि वाहन यांची शुद्धी करण्याची आठवण करून देते.

९. डोळे बंद करून नामजप करत असतांना एक नाग आईच्या शेजारी वेटोळे घालून शांत बसणे, तिने डोळे उघडले, तेव्हा तिला ‘शांत बसलेला नाग’, दिसणे. तेव्हा ती डोळे बंद करून न घाबरता पुन्हा नामजप करू लागणे

एकदा एका सत्संगात सर्वांना ध्यान लावून नामजप करण्यास सांगितले होते. तेव्हा आई डोळे बंद करून नामजप करत असतांना एक नाग आईच्या शेजारी वेटोळे घालून शांत बसला. जेव्हा तिने डोळे उघडले, तेव्हा तिला ‘नाग शांत बसलेला आहे’, असे दिसले. तेव्हा ते पाहून ती पुन्हा डोळे बंद करून नामजप करू लागली. त्या वेळी ती जराही घाबरली नाही. तिला ‘तो नाग नामजप करत आहे’, अशी अनुभूती आली.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली आणि असे साधक आई-वडील मिळाले, यासाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. अभिजीत विभूते, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.९.२०२२)

सौ. अंजली विभूते यांनी वेटोळे घालून शांत बसलेल्या नागाच्या शेजारी बसून डोळे बंद करून नामजप केला. त्याबद्दल त्यांचे कितीही कौतुक केले, तरी ते अल्पच आहे. मलाही त्यांच्यासारखा नागाच्या बाजूला बसून नामजप करता येणार नाही ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (८.१०.२०२२)