भारतियांना ट्विटरवर अयोध्येतील दीपोत्सवापेक्षा भारत-पाक क्रिकेट सामन्यातच अधिक रस !

अयोध्येतील दीपोत्सव

मुंबई – दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे २३ ऑक्टोबर या दिवशी प्रभु श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येमध्ये ऐतिहासिक दीपोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी ‘राम की पैडी’च्या समवेत अयोध्यानगरीतील विविध घाटांवर मिळून एकूण १५ लाख ७६ सहस्र पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. तसेच भव्य ‘लेझर शो’च्या माध्यमातून रामायणाचे सुंदर आणि भावविभोर करणारे दर्शन करवण्यात आले. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि अन्य मंत्री अन् मान्यवर उपस्थित होते. एकूणच स्वतंत्र भारतामध्ये शासकीय स्तरावर एवढ्या मोठ्या प्रमाणात हिंदु संस्कृतीच्या पुनर्जागरणाचे कार्य प्रथमच होत आहे. याविषयी चर्चा आणि अभिमान बाळगण्याऐवजी भारतियांमध्ये २३ ऑक्टोबरच्या सायंकाळी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या भारत-पाक यांच्यातील क्रिकेट सामन्याविषयीच चर्चा रंगल्याचे ट्विटरवर पहायला मिळाले. राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या ३० ट्रेंड्समध्ये (विषयावर घडवून आणलेली चर्चा) बहुतांश ट्रेंड्स या सामन्यावरच चालू असल्याचे लक्षात आले. यामध्ये अयोध्येतील दीपोत्सवाविषयी कोणताच ट्रेंड प्रथम ३० मध्ये नव्हता. यावरून ‘बहुतांश भारतियांची राष्ट्रनिष्ठा ही क्रिकेट सामन्यापूर्ती मर्यादित असल्याची किंबहुना केवळ मनोरंजनाच्या रूपातून राष्ट्रनिष्ठा प्रदर्शित होत असते’, अशी प्रतिक्रिया काही हिंदु धर्मप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • भारत-पाक क्रिकेट सामन्यामध्ये भारतीय हिंदूंना असलेला रस पहाता त्यांची मनोरंजनाच्या आडून असलेली राष्ट्रनिष्ठा आहे कि वास्तविक राष्ट्रनिष्ठा ? हा संशोधनाचा विषय आहे, हेच खरे !