भारतीय वंशाचे ऋषी सुनक झाले ब्रिटनचे पंतप्रधान !

१९३ खासदारांचा सुनक यांना पाठिंबा, तर २६ खासदारांचे समर्थन असलेल्या पेनी यांनी घेतली माघार !

ऋषी सुनक

लंडन – भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आहेत. पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या त्यागपत्रानंतर पंतप्रधानपदासाठी बोरिस जॉन्सन, ऋषी सुनक आणि पेनी मॉर्डंट यांची नावे समोर आली होती. जॉन्सन यांनी २३ ऑक्टोबर या दिवशीच शर्यतीतून बाहेर पडत असल्याचे घोषित केले. त्यानंतर सुनक आणि मॉर्डंट यांच्यामध्ये स्पर्धा झाली. मॉर्डंट यांनी शेवटी माघार घेतल्याने केवळ ४२ वर्षीय सुनक हे ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत.

१. ब्रिटनच्या संसदेत एकूण ३५७ खासदार आहेत. नवीन निवडणूक नियमांनुसार पंतप्रधान होण्यासाठी १०० पेक्षा अधिक खासदारांचा पाठिंबा असणे आवश्यक असते. १९३ खासदारांनी सुनक यांना जाहीर पाठिंबा दर्शवला होता, तर केवळ २६ खासदारांनी मॉर्डंट यांना समर्थन दर्शवले होते.

२. सुनक २८ ऑक्टोबरला शपथ घेणार असून २९ ऑक्टोबर या दिवशी त्यांचे मंत्रीमंडळ स्थापन होईल.

३. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांना आर्थिक विषयामध्ये अनुभव नसल्याचे समोर आल्यावर खासदारांकडून त्यांना विरोध करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना पदाचे त्यागपत्र द्यावे लागले.

४. दुसरीकडे सुनक हे व्यवसायाने ‘बँकर’च असल्याने आणि बोरिस जॉन्सन यांच्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्री पदही यशस्वीपणे भूषवल्याने हुजूर पक्षाच्या १८५ खासदारांना ते प्रथम पसंत आहेत.