नरकासुरवध !

उद्या २४ ऑक्टोबर २०२२ या दिवशी ‘नरकचतुर्दशी’ आहे. त्या निमित्ताने…

नरकासुर हा प्राग्ज्योतिषपूरचा (आताचे आसाम) फार दुष्ट राजा होता. त्याने देव आणि राजे यांना अतिशय पीडा देऊन त्यांच्या १६ सहस्र कन्या आणून अलका नगरीजवळ असलेल्या मणीपर्वतावर ठेवल्या होत्या. भगवान श्रीकृष्णास ही गोष्ट समजल्यावर त्याने नरकासुराचा नाश करण्याचे ठरवले. तो सत्यभामेसह प्राग्ज्योतिषपुरास आला आणि त्याने निसुंद, हयग्रीव, विरूपाक्ष आदी प्रतापी विरांचे पारिपत्य केले. यानंतर पांचजन्य शंख वाजवून श्रीकृष्णाने नरकासुरास आव्हान दिले. त्याचे आणि श्रीकृष्णाचे तुंबळ युद्ध झाले. त्यात श्रीकृष्णाने सुदर्शनचक्राच्या साहाय्याने नरकासुराचे शीर उडवले. त्यानंतर श्रीकृष्णाने त्या १६ सहस्र बंदिवासिनी स्त्रियांना मुक्त केले ! श्रीकृष्णाची ही कामगिरी अलौकिक अशी होती. मुक्त झालेल्या १६ सहस्र स्त्रियांनी आपल्याला मुक्त करणार्‍या श्रीकृष्णाला कृतज्ञतापूर्वक आपला धनीच मानले. नरकासुराच्या वधामुळे जिकडे तिकडे आनंद झाला. शत्रूच्या रक्ताचा टिळा लावून श्रीकृष्ण घरी येताच त्यास मंगलस्नान घालण्यात आले.  या ‘विजयाची स्मृती’ म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशी हा दिवस सर्व भारतीय लोक ‘नरकचतुर्दशी’ म्हणून साजरा करत असतात.’

(लेखक : प्रल्हाद नरहर जोशी)
(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’