कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी ! – जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस

नवी देहली – जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना अद्यापही जागतिक आणीबाणी असल्याचे सांगितले आहे. कोरोनासंबंधी आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमन आपत्कालीन समितीने बैठक घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. ३ वर्षांपूर्वी म्हणजेच वर्ष २०१९ च्या शेवटी सर्वांत प्रथम जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला आणीबाणी घोषित केले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना, ‘या महामारीने आपल्याला याआधीही आश्‍चर्यचकित केले असून पुढेही करू शकते’, असे म्हटले आहे.

भारतात २० आक्टोबर या दिवशी कोरोनाचे २ सहस्र १४१ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोनाची सध्याची एकूण रुग्णसंख्या २५ सहस्र ५१० वर पोचली आहे. सणांच्या काळात संक्रमणाची शक्यता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला तज्ञांकडून देण्यात आला आहे.